मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. विजय कदम यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. विजय कदम हे गेल्या दीड वर्षापासून कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज अंधेरी येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
विजय कदम यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी अंधेरीतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
ते गेल्या दीड वर्षापासून कर्करोगाशी लढा देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. विजय कदम यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. विजय कदम यांच्या निधनानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एकेकाळी रंगभूमी देखील गाजवणारे विजय कदम यांचे ‘विच्छा माझी पुरी करा’ हे लोकनाट्य तुफान गाजले होते. रंगभूमी, सिनेमांमध्ये काम करत असताना विजय कदम यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या निधनावर चाहते आणि सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणात शोक व्यक्त करत आहेत.
विजय कदम यांचे मराठी सिनेसृष्टीतील योगदान
विजय कदम यांनी चष्मेबहाद्दर, पोलिसलाईन, हळद रुसली कुंकू हसले, आम्ही दोघे राजा राणी अशा चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. विजय कदम यांनी अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये अजरामर भूमिका साकारल्या. याशिवाय ते काही मालिकांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. तर मराठी रंगभूमीवर टूरटूर, सही रे सही, विच्छा माझी पुरी करा, पप्पा सांगा कुणाचे अशा अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या.
शरद पवार यांनी केला शोक व्यक्त
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील विजय कदम यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ट्वीट करत म्हटले की, मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झाले. मराठी चित्रपट, मालिका तसेच रंगभूमीवर छोट्या भूमिकांपासून ते अगदी मुख्य नायकापर्यंतच्या सर्व भूमिका त्यांनी लीलया पार पाडल्या. आपल्या विनोदी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. अशा लोकप्रिय कलावंतास भावपूर्ण श्रद्धांजली.