मुंबई : पर्यावरणवादी चळवळीतील कार्यकर्ते आणि मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष असलेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज सकाळी पहाटे ५ च्या सुमारास दु:खद निधन झाले. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी वसईतील त्यांच्या राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. वसईतील जेलाडी या त्यांच्या निवासस्थानी त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. परंतु दीर्घ आजारामुळे त्यांचे निधन झाले आहे.
आज संध्याकाळी ६ वाजता त्यांच्या पार्थिवावर अन्त्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी सायंकाळी ४ पासून त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अन्त्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटोंचा जन्म ४ डिसेंबर १९४२ रोजी वसई तालुक्यातल्या नंदाखाल गावी झाला. त्यांचे शिक्षण हे नंदाखाल येथील संत जोसेफ मराठी हायस्कूलमध्ये झाले.
१९७२ साली त्यांनी कॅथॉलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. तर पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी.ए. तर धर्मशास्त्रात त्यांनी एम.ए. केले. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे वसई येथील कॅथॉलिक पंथाचे ख्रिस्ती धर्मगुरू होते. तरीही त्यांनी मराठी साहित्यात लक्षणीय कामगिरी केली. ख्रिस्ती व ज्यू धर्म हे त्यांच्या अभ्यासाचे प्रमुख विषय होते. त्यांनी मराठी साहित्यात विविध विषयांवर लिखाण केले आहे. धाराशिव (उस्मानाबाद) येथे पार पडलेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.