परभणी : राज्यभरातील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे. आंदोलनाच्या ५व्या दिवशी परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सोमवार, दि.५ रोजी सकाळी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने करत अधिष्ठाता, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कार्यालयात जाण्यापासून रोखले आणि महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले.
पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्रालयाकडून खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि माफसू सुधारणा विधेयक २०२३ रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात चारही वर्षाच्या बॅचचे मिळून ३०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. दरम्यान, पशुचिकीत्सालय बंद राहिल्यामुळे दूरवरून जनावरांना उपचारासाठी घेवून आलेल्या पशुपालकांना वाहन खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागला आणि प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला.