धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव शहरातील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे तत्कालिन चेअरमन विजय दंडनाईक यांना उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाने दि. २९ फेब्रुवारी रोजी कांही अटीवर जामीन मंजूर केला आहे. वसंतदादा बँकेतील ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात त्यांना दि. २२ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. ते काही काही दिवस पोलीस कोठडीत होते. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. दंडनाईक यांनी धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात नियमित जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता. तो अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. व्ही. जी. मोहिते यांनी नामंजूर केला होता. त्यामुळे दंडनाईक यांनी छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात जामीनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज मंजूर करण्यात आला आहे.
वसंतदादा नागरी बँकेचे तत्कालिन चेअरमन विजय दंडनाईक यांच्यासह तत्कालिन व्यवस्थापक दीपक देवकते, तत्कालिन संचालक मंडळ यांच्या विरोधात ठेवीवर जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात २८ जुलै २०२३ रोजी गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून सर्व आरोपी फरार होते. त्यापैकी मुख्य आरोपी असलेले विजय दंडनाईक हे दि. २२ जानेवारी रोजी पोलीसांना शरण आले होते. त्यानंतर पोलीसांनी त्यांना अटक केली होती. विजय दंडनाईक यांच्यासह सर्व आरोपींनी अटकपुर्व जामीन मिळावा म्हणून मोठे प्रयत्न केले. धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालय, छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठानेही काही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले होते. सर्वोच्च न्यायालयात ही दिलासा मिळणार नसल्याचा अंदाज आल्याने अखेर सहा महिन्यांनी बँक घोटाळ््यातील मुख्य आरोपी विजय दंडनाईक पोलीसांना शरण आले.
वसंतदादा बँकेने ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालिन चेअरमन विजय दंडनाईक, व्यवस्थापक दीपक भिवाजी देवकते, संचालक पृथ्वीराज विजय दंडनाईक, सुरेखा विजय दंडनाईक, गणेश दत्ता बंडगर, रामलिंग धोंडीअप्पा करजखेडे, शुभांगी प्रशांत गांधी, कमलाकर बाबूराव आकोसकर, गोरोबा झेंडे, हरिश्चंद्र शेळके, इलाही बागवान, प्रदीप कोंडीबा मुंडे, सीए भीमराव ताम्हाणे, विष्णूदास रामजीवन सारडा, महादेव गव्हाणे, लक्ष्मण नलावडे, सुरेश पांचाळ, नीलम चंपतराय अजमेरा हे संशयित आरोपी फरार झाले होते. ठेवीची मुदत संपूनही ठेवीची रक्कम परत मिळत नसल्याने ठेवीदार संस्था असलेल्या प्रभात सहकारी पतपेढीचे व्यवस्थापक विनोद वडगावकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरेशे तारण न घेता जवळच्या नातेवाईकांना व कर्मचा-यांना लाखो रूपयांचे कर्ज वाटप केले. वाटप केलेल्या कर्जाची वसुलीही केली नाही. बोगस कर्जवाटपाचा संशय आल्याने रिझर्व बँकेने वसंतदादा नागरी बँकेचा बँकींग परवाना रद्द केला. पाच लाखापेक्षा जास्तीची ठेव असलेल्या १३८ लोकांच्या जवळपास २० ते २२ कोटी रूपयांच्या ठेवी अडकलेल्या आहेत. यामध्ये धाराशिव शहरातील अनेक पतसंस्थेचे कोट्यवधी रूपये अडकले आहेत.
या अटीवर मिळाला जामीन
विजय दंडनाईक यांनी १ लाख रूपयांचा वैयक्तिक जातमुचलका भरल्यावर खालील अटींवर तत्सम रकमेच्या जामिनावर सोडण्यात येणार आहे. विजय दंडनाईक यांनी फिर्यादीच्या साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव आणू नये, ते कोणत्याही प्रकारे, फिर्यादी पुराव्याची छेडछाड करणार नाहीत, ते या न्यायालयात एक कोटी जमा करतील, त्यांनी आठ दिवसांच्या आत या न्यायालयात आणखी १ कोटी ३१ लाख ६८ हजार ४७२ रूपये जमा करावेत, त्यांनी या न्यायालयास हमीपत्र आणि सुरक्षा प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत, तरच न्यायालय जामीन देण्यास तयार आहे, तपास अधिका-यांनी ट्रायल कोर्टात दोषारोपपत्र दाखल करताना गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या रक्कमेचा जो आकडा असेल तेवढ्या रकमेच्या जमीनीची कागदपत्रे श्री. दंडनाईक यांनी उर्वरित रकमेसाठी आठ दिवसांच्या आत ट्रायल कोर्टात सादर करावीत. या अटीवर विजय दंडनाईक यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.