27.1 C
Latur
Thursday, June 27, 2024
Homeमहाराष्ट्रलंकेंच्या विजयावर विखेंना शंका; २१ लाख रुपये भरून करणार चौकशी

लंकेंच्या विजयावर विखेंना शंका; २१ लाख रुपये भरून करणार चौकशी

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या निलेश लंके यांनी पराभव केला. सुजय विखेंना पराभवाचा धक्का देत निलेश लंके जायंट किलर ठरले.

आता पराभवानंतर सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला असून चौकशीसाठी लाखो रुपयेसुद्धा भरले आहेत. सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम मशिनवर आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची चौकशी करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केलेला आहे. यामध्ये जवळपास १० उमेदवारांचा समावेश आहे. या सगळ्या नेत्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन चौकशीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे या प्रकारची चौकशी करण्यासाठी प्रत्येक ईव्हीएम मशिनकरिता चाळीस हजार रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. सुजय विखे पाटील यांनी मात्र विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएम मशिन चौकशी करण्याची मागणी केली आहे. चाळीस मतदान केंद्रांसाठी २१ लाख रुपये शुल्क भरल्याची माहिती समोर येत आहे.

लोकसभा निवडणुकीआधी अजित पवार गटातून शरद पवार यांच्या गटात सामील झालेल्या निलेश लंके यांनी सुजय विखेंविरोधात निवडणूक लढली. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात त्यांनी सुजय विखे पाटील यांचा २८ हजार ९२९ मतांनी पराभव केला. निलेश लंकेंना ६ लाख २४ हजार ७९७ मते मिळाली तर सुजय विखे पाटील यांना ५ लाख ९५ हजार ८६८ मते मिळाली. सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यात अटीतटीची लढत झाली. सुजय विखे पाटील यांनी २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांच्याविरोधात २ लाख ८१ हजार मतांनी विजय मिळवला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR