18.8 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रविनायक राऊत यांच्याकडे ४ कोटी ९० लाखांची प्रॉपर्टी

विनायक राऊत यांच्याकडे ४ कोटी ९० लाखांची प्रॉपर्टी

रत्नागिरी : उद्धवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. १६) उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत सादर केलेल्या मालमत्ता आणि संपत्तीविषयक शपथपत्रात त्यांनी स्थावर आणि जंगम मिळून एकूण ४ कोटी ९० लाख ३४ हजार ८२९ रुपयांची मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. त्यांच्या पत्नी श्यामल या जंगम मालमत्तेत त्यांच्यापेक्षा १६ लाख ७३ हजारांनी श्रीमंत आहेत.

विनायक राऊत यांनी २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या शपथपत्रात स्थावर मालमत्ता ३१ लाख ८७ हजार २९८ असल्याचे नमूद केले होते. यावेळी त्यांची जंगम मालमत्ता ६५ लाख ३४ हजार ८२९ रुपये एवढी आहे. यावेळी त्यांच्या जंगम मालमत्तेत ३३ लाख ३४ हजार ५३१ रुपयांची वाढ झाली आहे. तर त्यांच्या पत्नीची ८२ लाख ८ हजार ५८३ इतकी जंगम मालमत्ता आहे.

तसेच गेल्या वेळी विनायक राऊत यांची स्थावर मालमत्ता ३ कोटी ८७ लाख एवढी होती. यावेळी ती ४ कोटी २५ लाख झाली आहे. यावेळी त्यांच्या जंगम मालमत्तेत ३८ लाखांची वाढ झाली आहे. तर त्यांच्या पत्नीकडे ७४ लाखांची मालमत्ता आहे.

गेल्यावेळी विनायक राऊत यांच्याकडे २२० ग्रॅम सोने (६.५० लाख किमतीचे) होते. आताही तेवढेच सोने असून त्याची किंमत १३ लाख रुपये इतकी झाली आहे. पत्नी श्यामल यांच्याकडे गेल्यावेळी २४० ग्रॅम सोने होते. यावेळी त्यांच्याकडे ३४० ग्रॅम सोने आहे.
२०१९ च्या निवडणुकीवेळी विनायक राऊत यांच्याकडे स्कॉर्पिओ वाहन होते. यावेळी त्यांच्याकडे ३७ लाख ४१ हजार ३२१ रुपये किमतीचे फॉर्च्युनर हे वाहन आहे.

२०१९ च्या निवडणुकीवेळी विनायक राऊत यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून एकूण ४ कोटी १८ लाख ८७ हजार रुपयांचे ते मालक होते. यावेळी त्यांच्याकडे एकूण ४ कोटी ९० लाख ३४ हजार ८२९ रुपयांची मालमत्ता आहे. म्हणजे यावेळी त्यांच्या दोन्ही प्रकारच्या मालमत्तांत एकूण ७१ लाख ४७ हजार रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या निवडणुकीवेळी त्यांच्यावर २८ लाख रुपयांचे कर्ज होते. यावेळी २० लाख ९७ हजार १०० एवढे कर्ज आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR