नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वर्ष २०२४ येत्या काही दिवसांत समाप्त होणार आहे. यावर्षी गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या यादीत खेळाडूंचा समावेश आहे. भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगट ही गुगलवर सर्वाधिक सर्च केली गेलेली भारतीय खेळाडू ठरली आहे.
दरम्यान, २०२४ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या ‘टॉप १०’च्या यादीत ५ खेळाडूंचा समावेश आहे. सर्वात आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे, या यादीत विराट कोहली, एम. एस. धोनी आणि रोहित शर्मासारख्या बड्या खेळाडूंना स्थान मिळालेले नाही. २०२४ मध्ये विनेश फोगटची जोरदार चर्चा झाली होती. तिने २०२४ मध्ये झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील रेसलिंग क्रीडा प्रकारातील फायनलमध्ये प्रवेश केला होता.
मात्र फायनल सुरू होण्याच्या काही तासांपूर्वीच तिला अपात्र घोषित करण्यात आले होते. तिचे वजन काही ग्रॅम जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे तिच्या हातून हक्काचे पदक निसटले होते. त्यावेळी तिला भारतीयांकडून भरपूर सपोर्ट मिळाला होता.
विनेशने राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. ती हरियाणातील जुलाना विधानसभा क्षेत्रातून निवडणुकीसाठी उभी राहिली आणि जिंकूनही आली. कुस्तीतून निवृत्त होऊनही ती सर्वाधिक सर्च केली गेलेली खेळाडू ठरली.
हार्दिक पांड्या दुस-या स्थानी
खेळाडूंच्या यादीत भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुस-या स्थानी आहे. हार्दिक पांड्याने याच वर्षी मुंबई इंडियन्स संघात कमबॅक केले. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबईला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर त्याने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत दमदार कामगिरी केली. यासह शशांक सिंग आणि अभिषेक शर्मा हे दोघे देखील सर्वाधिक सर्च केले गेलेले खेळाडू ठरले.
गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेलेल्यांची संपूर्ण यादी
विनेश फोगट, नितीश कुमार, चिराग पासवान, हार्दिक पांड्या, पवन कल्याण, शशांक सिंग, पूनम पांडे, राधिका मर्चंट, अभिषेक शर्मा, लक्ष्य सेन.