ढाका- बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार भडकला असून त्यात जवळपास ७९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर हसीना यांनी आज सुरक्षा यंत्रणेबरोबर बैठक घेत आढावा घेतला आहे. भारताने देखील याची दखल घेतली असून +88-01313076402 हा हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे.
बांगलादेशमध्ये आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार आणि कटकारस्थाने करणारे विद्यार्थी नाहीत, तर दहशतवादी आहेत, असा दावा पंतप्रधान शेख हसीना यांनी आज केला. विद्यार्थ्यांनी आणि जनतेने अशा समाजकंटकांना दूर ठेवावे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी सरकारला सा करावे, असे आवाहनही हसीना यांनी केले.
बांगलादेशात सरकारी नोकरीतील आरक्षणात माजी सैनिकांच्या नातेवाईकांसाठी ठेवलेल्या कोट्याविरोधात देशभर आंदोलनाचा भडका उसळला होता. विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या या आंदोलनात हिंसाचार होऊन किमान दोनशे जणांचा मृत्यू झाला होता.
सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत कोटा कमी केला होता. त्यानंतर आंदोलन मिटले असे वाटत असतानाच आज पुन्हा विद्यार्थ्यांनी देशभर निदर्शने करत शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी ठिकठिकाणी त्यांचा सत्ताधारी अवामी लीगच्या कार्यकर्त्यांबरोबर वाद होऊन त्याचे पर्यवसन हिंसाचारात झाले. या हिंसाचारात किमान ७९ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. यानंतर हसीना यांनी सुरक्षा यंत्रणेबरोबर बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला.
या बैठकीत हसीना यांनी हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर जनतेशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, आंदोलनाच्या नावाखाली देशात हिंसाचार घडवून आणणारे विद्यार्थी नसून दहशतवादीच आहेत. या दहशतवाद्यांवर पोलादी हातांनी कारवाई करणे आवश्यक आहे. जनतेने या दहशतवाद्यांना दूर ठेवत सरकारला सा करावे. हसीना यांनी बोलावलेल्या बैठकीला तिन्ही सेनादलांचे प्रमुख, पोलिस प्रमुख आणि इतर तपास संस्थांचे प्रमुख उपस्थित होते.