लंडन : वृत्तसंस्था
सध्या बांगलादेशातील परिस्थिती नियंत्रणात नाही. बांगलादेशात एकीकडे तणाव असताना दुसरीकडे लंडनमध्येही परिस्थिती सामान्य नाही, तिथंही हिंसाचार उसळला आहे. त्यामुळं लंडनमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सरकारने अॅडव्हायजरी म्हणजेच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
साऊथपोर्टमध्ये एका डान्स क्लासमध्ये झालेल्या चाकूहल्ल्याच्या घटनेनंतर अनेक ठिकाणी हिंसाचार झाल्याचं पाहायला मिळालं आहे. साऊथपोर्टमध्ये झालेल्या चाकूहल्ल्यात तीन तरुणींचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमी झाले होते. त्यानंतर झालेल्या हिंसक घटनांप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १०० हून अधिक आरोपींना अटक केली आहे.
भारतीय उच्चायुक्तालय या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. परंतु, येथील सद्यस्थिती पाहता भारतातून ब्रिटनला येणा-या प्रवाशांना आम्ही सल्ला देत आहोत की, त्यांनी ब्रिटनला येताना, इथे राहत असताना सतर्क राहावं आणि सावधानता बाळगावी.
दरम्यान, अलीकडेच ब्रिटनमध्ये लिवरपूल, हल, ब्रिस्टल, लीड्स, ब्लॅकपूल, स्टोक-ऑन-ट्रेंट, बेलफास्ट, नॉटिंघम व मॅन्चेस्टरमध्ये दगडफेकीच्या घटना पाहायला मिळाल्या आहेत. अनेक ठिकाणी फटाक्यांद्वारे स्फोट घडवण्यात आले. देशात आलेले शरणार्थी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलच्या खिडक्या फोडण्यात आल्या आहेत. कित्येक दुकानांवर हल्ले झाले आहेत. अनेक दुकानं व वाहनांना आग लागवण्याचे प्रकार समोर येत आहेत. जमाव व पोलिसांमध्ये अनेक चकमकी घडल्या आहेत.