मेलबर्न : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला चौथा कसोटी सामना मेलबर्नवर २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ब्रिस्बेनवरील कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर भारतीय संघ मेलबर्नच्या दिशेने आज प्रवासाला लागला. मालिकेत १-१ अशी बरोबरी आहे आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये स्थान पक्के करण्यासाठी दोन्ही संघांना उर्वरित दोन्ही कसोटी जिंकणे महत्त्वाचे आहे. भारतीय संघ मेलबर्नवर पोहोचून त्या दृष्टीने कसून सरावाला लागेलही, परंतु त्याआधी विमानतळावर विराट कोहलीचा पारा चढलेला पाहायला मिळाला.
भारतीय संघाचे मेलबर्न येथे आगमन झाले आणि विराट कोहली तेथील प्रसारमाध्यमांवर चिडलेला दिसला. चॅनल ७ च्या कॅमे-यांनी कोहलीला मेलबर्न विमानतळावर एका टीव्ही पत्रकारासोबत जोरदार वाद घालताना पाहिले आणि हे सर्व त्यांनी रेकॉर्ड केले आहे. कडाक्याचे भांडण केल्यानंतर विराट पुन्हा मागे वळला आणि आणखी काही शब्द बोलून तेथून निघून गेला. कॅमेरामन त्याच्या कुटुंबियांचे फोटो काढत असल्याने विराट चिडला. विराटने अनेकदा त्याच्या मुला-मुलीचे फोटो काढू नका अशी विनंती प्रसिद्धी माध्यमांना केली होती, आज त्याचमुळेच तो चिडला. ३६ वर्षीय विराट कोहली सध्या फॉर्माशी झुंज देत आहे, त्याला मागील ४ वर्षांत कसोटीत फक्त ३ शतके झळकावता आलेली आहेत. ऑस्ट्रेलिया दौ-यातील पर्थवरील शतक वगळल्यास त्याला फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याला उर्वरित चार डावांत मिळून फक्त २६ धावा करता आल्या.
विराट कोहलीला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही अपयश आले होते. सहा सामन्यांत त्याने ०,७०, १, १७, ४ व १ अशाच धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौ-यात पर्थवर पहिल्या डावात ५ धावांवर बाद झाल्यानंतर दुस-या डावात त्याने नाबाद शतक झळकावले, परंतु पुढील तीन डावांत त्याला ७,११ व ३ अशाच धावा करता आल्या.