37.7 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रमतदान करणा-या पुणेकरांना मिळणार निम्म्या किमतीत पॉट आईस्क्रीम?

मतदान करणा-या पुणेकरांना मिळणार निम्म्या किमतीत पॉट आईस्क्रीम?

पुणे : पुण्यात मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून एक वेगळाच फंडा वापरण्यात आला आहे. पुण्यातल्या मतदारांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडावे आणि मत दिलेल्यांचे कौतुक व्हावे, या हेतूने चक्क निम्म्या किमतीत ‘पॉट आईस्क्रीम’ देण्यात येणार आहे. ‘शिरीष ट्रेडर्स’चे संस्थापक शिरीष बोधनी यांनी या ऑफरविषयी माहिती दिली आहे. फक्त पुणेकरांसाठी त्यांनी ही खास ऑफर दिली आहे. त्यामुळे मतदान केल्यावर पुणेकरांना आईस्क्रीम खाण्याचा आनंद लुटता येणार आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा १३ मे रोजी पार पडणार आहे. या टप्प्यामध्ये पुणे मतदारसंघातही मतदान होणार आहे. निवडणूक आली की लोकांनी मतदान करावे म्हणून वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो.

लोकांनी मतदान करावे म्हणून अनेक दुकानदार त्यांच्या दुकानामध्ये ऑफर्सही ठेवत असतात. वाढत्या उन्हामुळे याआधीच्या तीन टप्प्यांमध्ये मतदानाचे प्रमाण कमी झाले आहे.
पुण्यात लाकडी पॉटमध्ये तयार केलेले आईस्क्रीम उन्हाळ्यात अनेक जण आवर्जून खात असतात. कमला नेहरू पार्कजवळ असलेल्या दत्त मंदिराजवळ (प्रभात रस्ता) शिरीष बोधनी पॉट आईस्क्रीमचा व्यवसाय करतात. गेल्या ४० वर्षांपेक्षा जास्त काळ ते पॉट आईस्क्रीम विकत आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने खास ऑफर ठेवली आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी आणि मतदारांचे कौतुक व्हावे, हा त्यांचा या ऑफरमागचा उद्देश आहे.

पुण्यात १३ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या कालावधीत मतदान करून आलेल्यांना शिरीष बोधनी यांच्या आईस्क्रीमच्या दुकानात अर्ध्या किमतीत आईस्क्रीम मिळणार आहे. दुपारी ऊन वाढायच्या आत मतदारांनी मतदान करावे, यासाठी प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे शिरीष बोधनी यांनी सांगितले. या आईस्क्रीमची किंमत ६० रुपये आहे. पुण्यात मत दिलेल्या मतदारांना हे आईस्क्रीम ३० रुपयांना दिले जाणार आहे.
पुण्यात गेल्या अनेक वर्षांपासून पॉट आईस्क्रीम प्रसिद्ध आहे. पुणेकरांना घरोघरी आईस्क्रीम पुरवण्याची सेवा शिरीष बोधनी यांनी अनेक वर्षांपूर्वी सुरू केली होती.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR