सोलापूर : सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत जिमखान्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. मात्र, अद्याप जिमखाना सुरू करण्यात आला नसून जिमखान्याला टाळे लागले आहे. शहरातील युवक जिमखाना चालू होण्याच्या प्रतीक्षेत असून, जिमखाना चालू करण्याची मागणी युवकांकडून होत आहे.
कोरोनापासून आरोग्याबाबत नागरिकांत जागरूकता निर्माण झाली आहे. शरीर निरोगी व सुदृढ ठेवण्याकरिता व्यायामाकडे नागरिकांचा कल वाढताना दिसून येत आहे. त्या अनुषंगाने युवकांकडून जिमखाना चालू होण्यासाठी मागणी जोर धरत आहे. महानगरपालिकेच्या जिमखानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. मात्र, हा जिमखाना नागरिकांसाठी कधी खुला होणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. जिमखाना चालवण्याकरिता ठेकेदार पद्धतीने महानगरपालिकेचा विचार असून तशी हालवाल सुरू झाली आहे. मंगळवेढ्यातील एका कंपनीला हा जिमखाना चालवण्यासाठी देण्यात येणार असल्याचे महापालिका कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. या कार्याला किती कालावधी लागणार असा प्रश्न युवकांच्या मनात आहे. लवकरात लवकर जिमखाना चालू झाल्यास शहरातील युवकांना जिमखानाचा उपयोग व निरोगी शरीर ठेवण्यासाठी फायदा होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
पूर्वी महानगरपालिकेच्या जिमखान्यामध्ये युवकांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण व्यायाम करायचे. मात्र, सुशोभीकरणानंतर हा जिमखाना कधी चालू होणार या प्रतीक्षेत शहरातील नागरिक आहेत. पूर्वी बोनाफाईड धारक विद्यार्थ्यांना शुल्कामध्ये सवलत दिली जात असे मात्र, ठेकेदारी पद्धतीत विद्याथ्यांना ही सवलत सुरू राहणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. जिमखान्यामध्ये शुल्क किती असणार याची उत्सुकता आहे.महानगरपालिका जिमखाना बंद असल्याने नागरिकांना खासगी जिमखान्यांचा पर्याय निवडावालागत आहे. कोरोना महामारीमुळे नागरिक आरोग्याकडे गांभीयनि पाहत आहे.
त्या अनुषंगाने नागरिकांचा जिमखान्याकडे कल वाढलेला दिसून येत आहे. महानगरपालिकेचे जिमखाना नागरिकांसाठी कधी सुरू होणार या प्रतिक्षेत असून, महानगरपालिकेने जिमखाना लवकर चालू करावा जेणेकरून शहरातील नागरिकांना आरोग्य सुदृढ ठेवता येणार आहे. ठेकेदारांनी युवकांना परवडणारे शुल्क आकारावे विद्यार्थी वर्गाला बोनाफाईड प्रमाणपत्रावर महानगरपालिकेप्रमाणे शुल्कामध्ये सवलत देण्यात यावी व नागरिकांसाठी लवकरात लवकर जिमखाना खुला करावा अशी मागणी होत आहे.