पुणे : संयुक्त संसदीय समितीकडून मंजूर होऊन आलेले वक्फ सुधारणा विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनात मांडले जाणार आहे. त्याला काही राजकीय पक्ष आणि अनेक संघटनांकडून विरोध होत आहे. तर दुसरीकडे वक्फ सुधारणा विधेयकाला समर्थनही मिळत आहे. विधेयकाच्या समर्थनाथ बोलताना जुन्या आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांनी मोठे विधान केले आहे. वक्फ बोर्ड ही अतिक्रमण करण्यासाठीची एक संस्था आहे असे ते म्हणाले.
केंद्र सरकारकडून २०२४ मध्ये वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात आले होते. पण, हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याची मागणी झाली. त्यानंतर सरकारने हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले होते. हे विधेयक आता पुन्हा सरकारकडे पाठवण्यात आले आहे.
सुधारणा विधेयकामुळे वक्फ बोर्ड पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून याबद्दल बोलताना जुन्या आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराज म्हणाले की, वक्फ बोर्ड संवैधानिक नाही. बघा, वक्फ बोर्डाबद्दल सांगायचं तर ती काही घटनात्मक संस्था नाहीये. तिचा संविधानात कोणताही उल्लेख नाही. अतिक्रमण करण्यासाठीची एक संस्था आहे. त्या संस्थेत जे लोक काम करताहेत विशेषत: मौलाना कोकब मुस्तफा, मोहम्मद इलियासी, हे उलेमा आहेत आणि मोठे मुस्लीम अभ्यासक आहेत, ते म्हणताहेत की ती असंवैधानिक संस्था आहे आणि अतिक्रमणासाठी आहे. तिचा काही अर्थही नाही असे अवधेशानंद गिरी महाराज म्हणाले.