22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeसोलापूरउजनी धरणातून भीमा नदीत सोलापूरसाठी पाणी

उजनी धरणातून भीमा नदीत सोलापूरसाठी पाणी

सोलापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात सध्या आठ ते दहा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून भीमा नदीतून सोलापूरसाठी पाणी सोडण्यात आले आहे. पाच हजार क्युसेक विसर्गाने सोडलेले पाणी १४ जानेवारीपर्यंत औजमध्ये पोचणार आहे. सोलापूर शहराला सध्या सोलापूर ते उजनी या जुन्या पाइपलाइनद्वारे आणि हिप्परगा तलाव व औज बंधाऱ्यातून पाणीपुरवठा होतोय. हिप्परगा तलावातून गावठाण भागाला तर शहरातील जुळे सोलापूरसह बहुतेक भागाला औज बंधाऱ्यातून पाणीपुरवठा होतो. महापालिकेच्या वतीने औज बंधाऱ्याची दुरूस्ती केल्याने गळती थांबली तर काही दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे औजमध्ये पाणी शिल्लक होते.

२० डिसेंबरला उजनीतून सोडावे लागणारे पाणी आता सोडण्यात आले आहे. सुरवातीला सोळाशे क्युसेकने सोडलेल्या पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने पाच हजार क्युसेक केला आहे. दरम्यान, पंढरपूरपर्यंत भीमा नदीत पाणी असल्याने आणि नदी फार कोरडी नसल्याने सोलापूर शहराच्या या आवर्तनासाठी पाच टीएमसीपर्यंत पाणी जाईल, असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी सांगितले. उजनी धरणात सध्या एकूण पाणीसाठा ७१ टीएमसी असून त्यात साडेसात टीएमसी उपयुक्त साठा आहे. आता सोलापूर शहरासाठी त्यातील पाच ते साडेपाच टीएमसी पाणी जाणार आहे. त्यामुळे हे आवर्तन संपल्यानंतर उजनीतील उपयुक्त साठा दोन टीएमसीपर्यंतच शिल्लक राहील. शेतीसाठी नुकतेच जवळपास दीड महिने आवर्तन सोडण्यात आले आहे.

जिल्ह्यात सध्या दुष्काळ असल्याने उजनीतील पाणी जपूनच वापरावे लागणार आहे. तुर्तास महिनाभर शेतीसाठी पाणी सोडण्याची आवश्यकता नसल्याची सद्य:स्थिती आहे. तरीपण, पुढे शेतीसाठी एक आवर्तन सोडले जाणार की नाही, याचा निर्णय पुढील आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षेखाली होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे. उजनी धरणातील साठा मायनस १५ ते २० टक्के होईपर्यंत कॅनॉलद्वारे पाणी सोडणे शक्य आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR