परभणी : नांदेड शहरासाठीच्या पाण्याचे आरक्षण विचारात घेऊन दिग्रस बंधा-यातून २९.१६ दलघमि पाणी सोडण्याची विनंती नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) कार्यकारी अभियंता यांनी केली होती. परंतू दिग्रस बंधा-यात दि.२७ फेब्रुवारी रोजी एकुण २९.४८ दलघमि पाणीसाठा असल्यामुळे व भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता या संदर्भातील झालेल्या बैठकीत १८ दलघमी पाणी सोडण्यास सहमी देण्यात आली आहे. त्यानुसार दि.४ मार्च रोजी दिग्रस बंधा-यातून पाणी सोडण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी कळवले आहे.
या अनुषंगाने पाटबंधारे विभागाने दिग्रस बंधा-यातून दि.४ मार्च रोजी १८ दलघमि इतके पाणी तालुका दंडाधिकारी पालम यांच्या उपस्थितीत सोडावे. त्यापेक्षा जास्त पाणी सोडण्यात येवू नये. पाणी सोडताना अडथळा येवू नये यादृष्टीने पुरेसा पोलिस बंदोबस्त पाटबंधारे विभागास उपलब्ध करून द्यावा. पाणी सोडताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी पोलिस प्रशासनाने घ्यावी. तसेच दिग्रस बंधा-यातून सोडण्यात येणा-या पाण्याची चोरी, अनाधिकृत उपसा रोखण्यासाठी गोदावरी नदीकाठची सर्व कृषीपंप बंद राहतील त्यादृष्टीने विद्युत पुरवठा खंडीत करण्याची कार्यवाही करावी. तसेच तालुका दंडाधिकारी पालम यांनी १८ दलघमि पेक्षा जास्त पाणी सोडले जाणार नाही याची खात्री करून अहवाल सादर करावा असे आदेश जिल्हाधिकारी गावडे यांनी दिले आहेत.