मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने कधीकाळी एकत्र असलेले अनेक जुने सहकारी एकमेकांना भेटले. या निवडणुकीसाठी शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत विधिमंडळ परिसरात आले होते. त्यावेळी त्यांची आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची भेट झाली. या भेटीवेळी आपण एकत्र यायला पाहिजे, असे संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना उद्देशून म्हटले. त्यानंतर राज्यातील राजकारणात पुन्हा नव्या समीकरणांची चर्चा सुरु झाली. राऊत यांच्या वक्तव्यानंतर दोन जुने मित्रपक्ष पुन्हा एकत्र येणार की काय? या चर्चेला उधाण आले आहे.
२०१९ ची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने एकत्र लढवली. या युतीला जनतेने बहुमत दिले. परंतु निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री पदावरुन दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर दोन्ही पक्षांनी वेगळी भूमिका घेतली आणि युती तुटली. त्यानंतर भाजपने अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा प्रयत्न केला. परंतु ते सरकार काही तासांमध्ये पडले. शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेना गेली.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांना मिळाले. जून २०२२ मध्ये राज्यातील राजकारणात आणखी एक भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना सोबत घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला. ते भाजपसोबत गेले.
विधान परिषद निवडणूक निमित्ताने संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झाली. त्या भेटीत आपण एकत्र यायला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटल्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा बदलणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.