25.2 C
Latur
Thursday, June 13, 2024
Homeसोलापूरशहरात जलपुनर्भरणाची मोहीम राबवू

शहरात जलपुनर्भरणाची मोहीम राबवू

सोलापूर : २०० फूट खोल पाणी मुरण्यास अनेक वर्षे जावी लागतात. त्यामुळे जलपुर्नभरण अत्यावश्यक आहे. टंचाईचा काळ पाहता आम्ही पुन्हा शहरात जलपुनर्भरणाची मोहीम राबवू, नागरिकांचा प्रतिसाद आवश्यक आहे.असे मनपा उपायुक्त आशिष लोकरे म्हणाले. हद्दवाढ भागातील सोसायट्यांच्या बोअरवेलने तळ गाठल्याच्या तक्रारी सुरू होत्या. आता धर्मवीर संभाजी महाराज तलावाच्या बाजूला असलेल्या गृहनिर्माण सोसायट्या, अपार्टमेंटमधील बोअरवेलने तळ गाठला आहे. या सोसायट्यांनी पावसाळ्यापूर्वी जलफेरभरण यंत्रणा उभारण्याचे नियोजन सुरू केले आहे. शहरात चार वर्षांपूर्वी जलफेरभरणाची चळवळ सुरू झाली होती. ही चळवळ थंडावल्यामुळेच टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे मत मनपा अधिकारी, आर्किटेक्चर्स यांनी नोंदवले.

जिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाला. उजनी धरणाची पाणीपातळी इतिहासात पहिल्यांदा वजा ५० टक्क्यांच्या खाली गेला. मनपाकडून शहरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. लोकांना घरातील बोअरवेलचा आधार असतो. यंदा शहराची भूजल पातळी खालावली आहे. होटगी रोडच्या जवळ धर्मवीर संभाजी महाराज तलावाच्या बाजूला असलेल्या नामांकित सोसायट्यांकडून मनपाकडे टँकरची मागणी सुरू आहे. शहराची भूजल पातळी सतत खालावत आहे. स्मार्ट सिटी योजना, पालिकेच्या माध्यमातून शहरात अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार झाले. पावसाळ्यात रस्त्याच्या बाजूला पाणी मुरणार नाही. महापालिकेने चार वर्षांपूर्वी शहरातील बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्चर्स यांची बैठक घेतली, जलफेरभरणाची मोहीम सुरू केली. स्मार्ट सिटी योजनेतून ५० हून अधिक ठिकाणी यंत्रणा उभारली. नंतर ही मोहीम थंडावली.

राज्य सरकारने पाच हजार आकाराच्या बांधकाम परवान्यांना भूजल फेरभरण यंत्रणा उभारणे बंधनकारक केले. जे मिळकतदार ही यंत्रणा उभारतात त्यांना करात सवलत दिली जाते. या सवलतीसाठी मनपाकडे केवळ ८२ जणांनी अर्ज केला. शहरात अनेक ठिकाणी जलफेरभरण होत असणार. मात्र, त्याची नोंद मनपाकडे नसल्याचे कर संकलन विभागातून सांगण्यात आले. पाच जणांच्या कुटुंबाला दररोज १३५ लिटर पाणी लागते. यातील २० लिटर पाण्याचा पिण्यासाठी वापर होतो. उर्वरित पाण्याचा इतर कामांसाठी होतो. पाण्याचा अपव्यय हेसुद्धा पाणीटंचाईचे मोठे कारण आहे. भुजल पुनर्भरणाचे आवाहन आम्ही वेळोवेळी केले. त्याकड लोक दुर्लक्ष करतात. नामांकित सोसायट्यांकडून टँकरची मागणी होते हे खरे आहे. परंतु, त्यांना पाणी देता येणार नाही. जिथे नळाने पाणी येत नाही तिथे मात्र मनपा मदत करेल.
अक्कलकोट रोड, जुळे सोलापूर, देगाव, शेळगी या भागांतील अनेक सोसासट्यांमधून बोअरवेल आटल्याच्या तक्रारी सुरू आहेत. या सोसायट्यांचे संचालक मनपा पाणीपुरवठा विभागाकडे टँकरची मागणी करीत आहेत. जिथे नळ आहे त्या भागात मनपा टैंकर देणार नाही. तुम्ही नळाचे पाणी साठवून ठेवा आणि वापरा असा स्पष्ट सल्ला पाणीपुरवठा विभागाकडून दिला आहे. या काळात पाणीपुरवठा अधिकारी या सोसायट्यांच्या प्रमुखांना जलफेरभरणाची आठवण करून देत आहेत.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR