पुणे : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्ही शरद पवार यांच्याच नेतृत्वाखाली लढू. आमचा स्वतंत्र बाणा कायम राहील. आम्ही दुस-या कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही, अशी स्पष्टोक्ती शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. कालपासून शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी बुधवारी तसा प्रस्ताव शरद पवार यांच्यासमोर मांडल्याचे सांगितले जात होते. अशातच बुधवारी पुण्यात शरद पवार गटाच्या बैठकीतून बाहेर पडलेल्या मंगलदास बांदल यांनी दिलेल्या माहितीमुळे शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. परंतु, आमचा पक्ष कोणत्याही अन्य पक्षात विलीन होणार नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरवण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत, असे वक्तव्य प्रशांत जगताप यांनी केले.
शरद पवार यांनी बुधवारी सकाळी राज्यभरातील नेते, खासदार, आमदार आणि माजी मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणासंदर्भात चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाने आमच्या पक्षाला येत्या दोन-तीन दिवसांत पक्षाचे नाव आणि चिन्ह द्यावे, अशी आमची मागणी आहे. शरद पवार साहेबांचे नेतृत्व संपूर्ण राज्याला मान्य आहे. त्यामुळे आम्ही आगामी निवडणुकांमध्ये साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढणार आहोत. सुप्रीम कोर्टाने आम्हाला मूळ चिन्ह आणि पक्षाचे नाव दिले नाही तर आम्ही पक्षाचे नवे नाव आणि चिन्ह घेऊन लढू. आमचा स्वतंत्र बाणा कायम राहील. तेच अस्तित्व घेऊन आम्ही विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असे प्रशांत जगताप यांनी म्हटले.
विलीनीकरणाच्या बातम्यांमध्ये सत्यता नाही : अनिल देशमुख
राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र राहील. राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होण्याच्या बातम्या तथ्यहीन. या बातम्या कोण पेरतंय याचा शोध घ्या. जाणीवपूर्वक या बातम्या पेरल्या जात आहेत असे वाटते. या बैठकीत महाविकास आघाडीच्या सभेबाबत चर्चा झाली, अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी दिली. तर अनिल देशमुख यांनीही यावर स्पष्टीकरण दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या बातम्यांमध्ये सत्यता नाही. आम्ही स्वतंत्र चिन्ह घेऊन लढण्याच्या तयारीत आहोत. महाविकास आघाडीकडून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून लढणार आहोत, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.