परळी : प्रतिनिधी
आज प्रचाराचा शेवटच्या दिवशी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी उडाल्या. त्यातच आता परळीच्या सभेत आमदार पंकजा मुंडे यांनी एक मिश्किल विधान केले. ‘खासदार व्हायला गेले अन् आमदार झाले’ असे वक्तव्य भाजप सरचिटणीस व विधान परिषद सदस्य पंकजा मुंडे यांनी केले.
लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी मी या ठिकाणी असलेल्या अर्ध्याहून अधिक लोकांच्या पाया पडत होते. पाच-सहा हजार मतांनी झालेला पराभव हा पराभव नसतो. तुमचीच नजर लागली असं वाटतंय. मी दिल्लीला जाईन, दिल्लीला जाईन, असं सतत घोकत होते. ताई दिल्लीला गेल्यावर मग आम्ही काय करणार, त्या इथे लक्ष देणार नाहीत, असं सगळं यांचं चाललेलं. घ्या मग आता आले मी परत तिथेच! ‘खासदार व्हायला गेले आणि मी आमदार झाले’ असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
माझी आणि धनंजय मुंडे यांची भूमिका आता बदलली आहे. पूर्वी मी विधानसभेत होते आणि ते विधानपरिषदेत होते. आता मी विधानपरिषदेत आहे आणि धनुभाऊ विधानसभेत आहेत. ते पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून जातील. आमची भूमिका थोडीशी बदलली आहे आणि तुम्हा मतदारांना एकाच बटणात दोन आमदार मिळाले आहेत. तुम्हाला अजून काय पाहिजे, असे पंकजा मुंडेंनी म्हणाल्या.