तेहरान : पाश्चात्त्य देशांनी इराणने रशियाला बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे विकल्याचा आरोप करून इराणवर नवीन निर्बंध लादले आहेत. यावर इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अर्घाची यांनी तेहरानवर काही पाश्चात्त्य देशांनी लादलेल्या नवीन निर्बंधांवर जोरदार टीका केली. अर्घाची म्हणाले की, पाश्चात्त्य देशांना हे माहीत असले पाहिजे की, इराणवर निर्बंधनाचा काहीच उपयोग होणार नाही. हे त्यांना अजूनपर्यंत माहीत नाही, हे आश्चर्यकारक आहे. अमेरिका, फान्स, ब्रिटन आणि जर्मनी आण्विक मुद्यावर त्यांचे हेतू आमच्यावर लादू शकत नाहीत आणि आम्ही रशियाला बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे विकल्याचे आरोप निराधार आहेत, असेही परराष्ट्रमंत्री अर्घाची म्हणाले.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत परराष्ट्रमंत्री पुढे म्हणाले की, इराण पूर्ण ताकदीने आपल्या मार्गावर पुढे जात राहील. मात्र, आपला देश संवादाचे दरवाजे नेहमीच खुले ठेवेल. संवादाचा मार्ग कधीही सोडला नाही, परंतु अशी मुत्सद्दी प्रक्रिया परस्पर आदरावर आधारित असली पाहिजे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासेर कनानी यांनी शनिवारी सांगितले की, इराणने रशियाला बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे विकल्याबद्दलचे कोणतेही दावे निराधार आहेत.
बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे विकल्याचे दावे निराधार
युक्रेनविरुद्ध वापरण्यासाठी इराणने रशियाला कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा पुरवठा केल्याच्या पाश्चात्त्य देशांच्या आरोपाचा इराणने निषेध केला आहे. परराष्ट्रमंत्री अर्घाची यांनी सांगितले की, इराणने रशियाला बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे दिली नाहीत. अमेरिका आणि त्याचे मित्र राष्ट्र चुकीच्या गुप्तचर माहितीवर काम करत आहेत. तर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासेर कनानी यांनी ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीने लादलेल्या निर्बंधांना इराणमधील लोकांवर आर्थिक दहशतवाद असे वर्णन केले. तीनही युरोपीय देशांना योग्य कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.