मुंबई : विधानसभा निवडणुकीची सर्व पक्षांनी तयारी सुरू केली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचीही जनसन्मान यात्रा राज्यभर सुरू आहे. आज ही यात्रा मुंबईत झाली. या यात्रेत काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी उपस्थित होते. दरम्यान, जनसन्मान यात्रेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी जनतेला आवाहन केले.
लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी तुमची दिशाभूल बदलली. ते म्हणाले, आरक्षण बदलणार, संविधान बदलणार. हे चुकीचे होते. हे आम्ही सगळ्यांना सांगत होतो, पण विरोधक खोट सांगायला यशस्वी झाले. आम्हाला याचा फटका बसला. मासवर्गीय, आदीवासी समाजाचा आम्हाला फटका बसला. सीएए कायद्याबाबत वेगळे वातावरण तयार केले, त्याचाही फटका बसला. पण आम्ही शांत बसलो नाही. सर्व सामाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आम्ही कोणालाही वा-यावर सोडणार नाही, कोणी चुकीचे वागत असेल तर आम्ही त्याला आम्ही पोलिसी हिसका दाखवू. आपण आमच्यावर विश्वास ठेवा. लोकसभेला झाले तसे होऊ देऊ नका, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आता आम्ही तुमच्यासाठी लाडकी बहीण योजना आणली, मुलींसाठी शिक्षण मोफत केले. शंभर टक्के फी राज्य शासन भरणार आहे. जे मुलींमध्ये कतृत्व आहे ते मुलींनी दाखवावे. यंदाच्या अर्थसंकल्पात मोठ्या योजना आणल्या आहेत असेही अजित पवार म्हणाले.
योजना बंद व्हावी यासाठी विरोधक कोर्टात
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फक्त तुमच्यासाठी आहे, ही योजना बंद करण्यासाठी विरोधक कोर्टात गेले. काहीजण आम्हाला ही योजना चुनावी जुमला असल्याचे म्हणाले. मी यावर्षी दहावा अर्थसंकल्प मांडला आहे. विरोधक ही योजना बंद करायला निघाले आहेत. आता ही योजना चालू करायची आहे की नाही हे तुम्हाला बघायचे आहे. जर योजना सुरू ठेवायची असेल तर तुम्हाला महायुतीच्या मागे उभे राहावे लागेल असेही अजित पवार म्हणाले.
झिशान सिद्दीकींचा काँग्रेसला घरचा आहेर
काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी हे देखील लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसपासून लांब असलेले आमदार झिशान सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या जनसन्मान यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी बोलताना मोहब्बत की दुकान खोलनेसे कुछ नही होता असे म्हणत झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला घरचा आहेर दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत झिशान सिद्दीकी यांना विशेष स्थान देण्यात आले होते. माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात बोलताना झिशान यांनी काँग्रेस नेत्यांना चांगलेच सुनावले. तसेच या कार्यक्रमात सिद्दीकी यांनी अजित पवार यांचेही कौतुक केले.