23.5 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयजे उद्धव ठाकरेंसोबत झाले तेच शरद पवारांसोबत घडले

जे उद्धव ठाकरेंसोबत झाले तेच शरद पवारांसोबत घडले

२४ वर्षांनंतर शरद पवारांना नवा पक्ष काढावा लागणार

नवी दिल्ली : कोरोना काळानंतर सुरू झालेला राज्यातील सत्तासंघर्ष आजपर्यंत कायम आहे. मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे जवळचे मानले जाणारे एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार फोडून शिवसेनेला भगदाड पाडले आणि सुरत व्हाया गुवाहाटी करत भाजपसोबत सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. जे शिंदेंनी केले तेच दीर्घकाळ महाराष्ट्राच्या आणि दिल्लीच्या राजकारणात सक्रिय असलेले शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर झाले. बेभरवशाचे राजकारण करणारे पवारांचे पुतणे अजित पवार यांनी राष्ट्रवादीत फूट पाडून शिंदे सरकारमध्ये सामिल झाले. मंगळवारी निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला खरी राष्ट्रवादी म्हणून मान्यता दिली.

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देत पक्ष आणि चिन्हही सुपुर्द केले होते. तोच प्रकार आता शरद पवारांसोबत घडला असून आयोगाने पक्ष अन् चिन्ह दोन्ही अजित पवार गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय ८३ वर्षीय शरद पवारांना मोठा धक्का मानला जात आहे. तर, यामुळे सत्तेसाठी कसे महाभारत घडते हे महाराष्ट्रातील जनतेला जवळून पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालामुळे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून आणि नेत्यांकडून रोष व्यक्त केला जात असून, शरद पवारांनी आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे शरद पवार गटाने या निर्णयाचे स्वागत केले असून मंत्रालयापासून ते पक्ष कार्यालयापर्यंत पक्षाचे झेंडे लावून जल्लोष साजरा करत आहेत. तर विरोधी नेत्यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाने मंगळवारी दिलेल्या निर्णयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्याकडे सोपविले असून, शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाकडे आज चार वाजेपर्यंत द्यावे लागणार आहे. काँग्रेसमधून बाहेर पडत १० जून १९९९ रोजी शरद पवार यांनी स्वबळावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. २०१४ पर्यंत महाराष्ट्रात आणि केंद्रात काँग्रेस पक्षासोबत आघाडी करत सत्तेत राहिले. यावेळी त्यांनी अजित पवार यांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. मात्र, त्याच अजित पवारांनी ८३ व्या वर्षी शरद पवारांना २४ वर्षांनंतर नव्याने सर्व पट मांडायला लावला.

शरद पवारांकडील संख्याबळ
महाराष्ट्रात १५ आमदार, केरळमध्ये १ आमदार, महाराष्ट्र विधान परिषद ४ आमदार, लोकसभेचे ४ खासदार आणि राज्यसभेचे ३ खासदार.
अजित पवारांकडील संख्याबळ
महाराष्ट्रात ४१ आमदार, नागालँड ७ आमदार, झारखंडमध्ये १ आमदार, विधान परिषदेत ५ आमदार, राज्यसभेचा १ खासदार आणि लोकसभेचा १ खासदार.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR