बीड : बहुप्रतिक्षित शिक्षक भरती सप्टेंबरपासून सुरू झाली. तसंच, नोव्हेंबरमध्येही आणखी २० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही प्रक्रिया अद्यापही सुरू झालेली नाही. याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना एका महिला उमेदवाराने विचारलं असता त्यांच्याशी दीपक केसरकर यांनी उर्मट भाषेत संवाद साधला. तसंच, संबंधित महिला उमेदवाराला अपात्र करण्याचीही धमकी दिली. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या मंत्र्यांना नेमके झाले तरी काय?’ असा सवाल करत संताप व्यक्त केला आहे.
दीपक केसरकर आज बीडच्या कपिलधार येथे दौ-यावर आहेत. येथे त्यांना शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असलेले काही उमेदवार भेटायला आले. त्यावेळी एका महिला उमेदवाराने शिक्षक भरती प्रक्रिया केव्हा पूर्ण होणार असा प्रश्न विचारला. त्यावर, दीपक केसरकर म्हणाले की, पोर्टल सुरू झाले असून नोंदणीही सुरू झाली आहे. पुढील प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. परंतु, या उत्तरावर समाधान न मिळाल्याने संबंधित महिला उमेदवाराने प्रक्रिया पूर्ण होण्याचा कालावधी विचारला.
त्यावर दीपक केसरकर संतापले. ‘तुम्ही जर बेशिस्त असाल तर तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार नाही. तुम्ही कसे मुलांना शिकवणार?’ असा प्रतिप्रश्न केसरकरांनी विचारला. त्यावर त्या महिलेने केवळ पुढची प्रक्रिया कशी होणार असाच सवाल विचारला. तेव्हा दीपक केसरकर संतापले आणि म्हणाले की, ‘अजिबात मध्ये बोलायचे नाही, नाहीतर तुमचे नाव घेऊन तुम्हाला अपात्र करेन’ अशी धमकी दीपक केसरकरांनी ऑन कॅमेरा या महिलेला दिली.
सुप्रिया सुळेंनी हेच वृत्त शेअर करत सरकारला धारेवर धरले आहे. ‘महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री शिक्षकभरतीबाबत विचारणा करणा-या उमेदवार मुलीला ‘डिसक्वालिफाय’ करण्याची धमकी देतानाचा व्हिडिओ माध्यमातून प्रसिद्ध झाला आहे. हा व्हिडिओ पाहून ‘या मंत्र्यांना नेमके झाले तरी काय?’ असा प्रश्न पडतो’, असे सुप्रिया सुळे म्हणाले.
‘एक ज्येष्ठ मंत्रीमहोदय आजकाल जाहिर सभांतून जनतेला धमकावताना दिसतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना त्यांची भूमिका मान्य आहे की या तिघांचीही त्यांना मूक संमती आहे? या मंत्र्यांना नेमकी भीती कशाची आहे? त्यांच्या जे मनात आहे तोच जनतेच्या दरबारात त्यांचा फैसला ठरलेला आहे. तोवर मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या मंत्र्यांना आवरावे, ही विनंती. यासोबतच दीपक केसरकर यांनी तातडीने संबंधित मुलीची जाहिर माफी मागितली पाहिजे’’, अशीही मागणी सुप्रिया सुळेंनी एक्स पोस्टद्वरे केली.