सोलापूर : मला काम कोणतंही सांगा. काम करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी जे वाटेल ते काम करण्याची माझी तयारी आहे. कारण बोलणं माझं काम नाही. मी सांस्कृतिक क्षेत्रात नसल्यामुळे तुम्हाला पाहिजेल असं, कानाला रुजल असं, गोड वाटेल असं, दिखाऊ आणि दिशाभूल करणारं, असं मी कधीही बोलणार नाही. जे टिकाऊ असेल तेच मी बोलणार आहे. तेच मी करणार आहे, असे आमदार सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले. आज मी बोलण्याचं टाळलं होतं, कारण माझ्या प्रत्येक बोलण्याचा ध चा मा होतो. हेतू न बघता, पूर्ण न वाचता आणि ऐकता सोयीचं तेवढंच घ्यायचं आणि कारण नसताना बदनामी करायची, त्यामुळे मी आज बोलणार नव्हतो, अशी खंत भारतीय जनता पक्षाचे आमदार सुभाष देशमुख यांनी बोलून दाखवली.
बिल्डर असोसिएशनच्या कार्यक्रमात बोलताना आमदार देशमुख यांनी सोलापूरला मोठं खेडं म्हटलं होतं. त्याच कार्यक्रमात बोलताना भाजपचेच दुसरे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूरची महती सांगून सुभाषबापूंनी सोलापूरला खेडं का म्हटलं असावं, असा सवाल उपस्थित केला होता. त्यावरून सोलापुरात वादंग उठलं होतं. त्याबाबत सुभाष देशमुख यांनी नाट्य संमलेनाच्या कार्यक्रमात न बोलण्याची भूमिका घेतली होती. मात्र, आयोजकांच्या विनंतीवरून ते बोलले. सोलापूरला विभागीय नाट्य संमेलन होणार आहे. त्या संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमात सुभाष देशमुख बोलत होते. ते म्हणाले की, हेतू न बघता, पूर्ण न वाचता, न ऐकता, जेवढं सोयीचं आहे. तेवढंच घ्यायचं आणि कारण नसताना बदनामी केली जाते. म्हणूनख मला जेव्हा संयोजकांनी बोलायचं का, असं विचारलं तेव्हा मी बोलणार नाही, असे सांगितलं होतं.