22 C
Latur
Friday, December 20, 2024
Homeमहाराष्ट्रलाचारी कशासाठी?

लाचारी कशासाठी?

राज ठाकरेंचा सरकारला सवाल

मुंबई : कल्याणधील मराठी व्यक्तीला मारहाणाची पडसाद शुक्रवारी विधीमंडळातही उमटले. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या घटनेवरून संताप व्यक्त करत राज्य सरकारला ठणकावले आहे. तुम्हाला तुमचा मराठी बांधव सोडून हे असले मुजोर जास्त जवळचे का वाटतात?, असा सवाल त्यांनी केला आहे.

कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा आणि जर सरकारला जमत नसेल, तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातले तर आमच्याकडे बोट दाखवू नका, असा सूचक इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. त्यांनी कल्याणधील घटनेबाबत सोशल मीडियात पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी परप्रांतियांकडून मराठी लोकांना होत असलेल्या मारहाणीच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे.

कल्याणमध्ये एका मुजोर अमराठी माणसाने मराठी माणसाला, मराठीपणावरून अर्वाच्य शिव्या देत, जबर मारहाण केली. अशीच मुजोरी काही दिवसांपूर्वी गिरगावमध्ये एका अमराठी माणसाने दाखवली. कल्याणच्या घटनेत कोणीतरी शुक्ला नावाचा माणूस होता, महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्वेषी शुक्ला, गुप्तपणे राहत आहेत असे ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेली घटना असो की ही कल्याणमधली, प्रत्येकवेळेला हे असले महाराष्ट्रद्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात आणि अजून किती तुम्हाला वाकवता येईल हे बघत असतात. आज कित्येक पिढ्या इथल्या मातीत मिसळून राहिलेले असंख्य अमराठी माणसे आहेतच. पण ही जी महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिलावळ इथे गेले काही वर्ष वळवळायाला लागली आहे, ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहे, त्यांना वेळीच ठेचले पाहिजे, असे राज ठाकरेंनी लिहिले आहे.

भूमिपूत्राला आधार कधी?
लाडकी बहीणच्या नावाखाली मते मागणा-यांना माझा प्रश्न आहे की, ज्यांना मारहाण झाली त्या व्यक्तीची बायको, आई, बहीण ही तुमची लाडकी बहीण नाही का? मंत्रिपदे महाराष्ट्राची उपभोगणार परंतू त्याच भूमिपुत्राला तुमचा आधार नसणार! तुम्हाला तुमचा मराठी बांधव सोडून हे असले मुजोर जास्त जवळचे का वाटतात? तुमची ही लाचारी कशातून येते ते मला माहित नाही आणि तुमची लाचारी तुम्हाला लखलाभ, असे खडेबोल राज ठाकरेंनी सरकारला सुनावले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR