पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज ठाकरे यांचे नक्की काय स्थान आहे हे माहिती नाही. मी ऐकलंय की, नाशिक हा त्यांचा बालेकिल्ला आहे. पण हल्ली ते नाशिकमध्ये दिसत नाहीत असे राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे ते प्रचारसभांना उपस्थित राहत आहेत. नुकतेच एका सभेत बोलताना राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला केला होता. महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवारांनी सुरुवात केल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले होते. यावर आता शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या आरोपांना दोन वाक्यात प्रत्युत्तर दिले आहे. नाशिक दौ-यावर असलेल्या शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
ठाण्याचे शिवसेनचे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याणचे श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारसभेत बोलताना राज ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधला होता. ज्या शरद पवारांना आघाडीत घेऊन बसला आहात, त्यांनीच महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण सुरु केले. पवारांनी पहिल्यांदा काँग्रेस फोडली, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. त्यावर बोलताना शरद पवार यांनी मोजक्या शब्दात प्रत्युत्तर दिले.
शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत
मोदींना बोलायला दुसरे काही नाही त्यामुळे वारंवार ते बोलतात. नकली शिवसेना म्हणजे काय? आज शिवसेना, शिवसैनिक हा कुणाबरोबर आहे? शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्यासोबत आहे असे शरद पवार म्हणाले. यावेळी पक्ष फुटला तेव्हा शरद पवार झोपत होते का असे मोदी म्हणाल्याचे पत्रकाराने म्हटले. त्यावरही शरद पवारांनी भाष्य केले. नरेंद्र मोदींना आमच्या पक्षाची चिंता का? असा सवाल त्यांनी केला.