24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeसोलापूरमहिला आरक्षण आल्यावर जानकर साडी घालून उमेदवारी मागतील

महिला आरक्षण आल्यावर जानकर साडी घालून उमेदवारी मागतील

पंढरपूर – सोलापूर राखीव मतदार संघातून भाजपकडे उमेदवारीची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकरांवर आज भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण ढोबळे यांनी जोरदार हल्लाबोल केला. आगामी काळात महिला धोरण आले तर उत्तम जानकर साडी घालून उमेदवारी मागतील असा टोलाही त्यांनी लगावला. यावर आता जानकर काय उत्तर देणार हे पहावे लागेल.

सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून स्वतः लक्ष्मण ढोबळे, माजी खासदार अमर साबळे, विद्यमान खासदार जयसिध्देश्वर महास्वामी, राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर आदी इच्छुक असून त्यांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशातच माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम जानकर यांनी सोलापुरातून लोकसभा लढविण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र, जातीच्या दाखल्यावरून त्यांना खाटीक समाजासह भाजपमधूनच विरोध होताना दिसत आहे. माजी मंत्री तथा भाजपचे प्रवक्ते लक्ष्मण ढोबळे यांनीही जानकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत चांगलेच शालजोडे मारले. आगामी काळात महिला धोरण आले तर उत्तम जानकर साडी नेसून येणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे हे पंढरपूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी जानकर यांच्या जातीच्या दाखल्याबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, केवळ राजकीय स्वार्थासाठी जातीचा दाखला बदलून जर कोणी उमेदवारी मागत असेल तर ते डीएनए अडचणीत आणणारे आहे. कारण नसताना जात बदलून सांगणे हे योग्य नाही. ते पै-पाहुण्यांमध्ये बेईज्जत करणारे आहे.

उमेदवारीच्या अट्टाहासापायी उद्या महिला आरक्षणाचे धोरण २०२६ मध्ये अस्तित्वात येणारच आहे, त्यामुळे देशातून १८१ महिला खासदार म्हणून निवडून येणार आहेत, त्यावेळी जात बदलणारे उत्तमराव जानकर यांचे सारखे अभ्यासू, विचारवंत आणि सर्वपक्षीयांशी संबंध असणाऱ्या नेतृत्वाला वाटलं तर ते म्हणणार की, महिला आरक्षण आहे, मी साडी घालून आलो आहे, मला मान्य करा. साडी घालून आलो की मी महिला झालो आहे, असे हे म्हणणार, हे घडू शकतं, असा दावा ही ढोबळे यांनी केला.यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव नितीन काळे, डी. राज सर्वगोड आदी उपस्थित होते.

जातीचे बनावट दाखले काढण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः हिंदू खाटीक समाजाने तर चंगच बांधला आहे. अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत, ते काही योग्य नाही. सोलापूरमधील दलित चळवळीत काम करणाऱ्या काही लोकांनी आक्षेपही घेतला आहे. तिकिटासाठी जात बदलण्यापेक्षा त्यांनी कामाठीपुरीत राहायलाच जावं, हे जास्त चांगलं आहे, असा सणसणीत टोला ही माजी मंत्री ढोबळे यांनी जानकरांना लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR