जालना : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने हिंदू समाजात फूट पाडल्याचा वक्तव्य करणा-या कालीचरण महाराजांना आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी अक्षरश: झोडपून काढले आहे.
आंतरवाली सराटीत आमच्या आयाबहिणींवर लाठीहल्ला झाला तेव्हा हा कुठं होता? त्या आयाबहिणी हिंदू नव्हत्या का? असा रोकडा सवाल जरांगे यांनी केला आहे. कालीचरण बाबांनी अलीकडंच एका कार्यक्रमात मनोज जरांगे यांची तुलना राक्षसाशी केली होती. हा माणूस हिंदू समाजात फूट पाडतो आहे असे कालीचरण म्हणाले होते. यावर जरांगे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. या बाबाला या विषयावर बोलण्याची काही गरजच नव्हती. आम्ही संत-महंतांना मानणारे लोक आहोत.
पण आरक्षणाचा बाबाशी संबंध काय? या लोकांनी आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार दिले पाहिजेत. एकजूट राहण्यासाठी आवाहन केले पाहिजे. महाराजांचे हे काम असते. आरक्षणावर बोलणं हे त्यांचं काम नाही. पण हा कोण बाबा आला? विचित्र प्राणी आहे. याला काय घेणे होते. मी कधी याला काही बोललो होतो का? हा कुठनं टिकल्या लावतो. पुढनं लावतो का मागणं लावतो. आम्ही कधी काही बोललो होतो का? याला मी ओळखतही नाही, असे जरांगे म्हणाले.
हिंदुत्वाच्या गोष्टी याने आम्हाला शिकवायची गरज नाही. आंतरवाली सराटीत आमच्या आयाबहिणींवर हल्ला झाला तेव्हा हा टिकल्या कुठे होता. त्या आयाबहिणी ंिहदू नव्हत्या का? आमच्या पोरांनी फाशी घेतली तेव्हा हा कुठे होता. ते हिंदू नव्हते का? बेअकल्यासारखा बोलतो. टिकल्या लावतो. नथ घालतो. हा वर वेगळा दिसतो, खाली वेगळा दिसतो. मराठे हिंदू नाहीत का? हिंदूमध्ये अर्धा मराठा आहे. धर्मावर संकट येते तेव्हा आमच्यासारखे गरीब हिंदूच रक्षण करतात. मराठे, ओबीसी आणि अठरापगड जातीच वार झेलतात. तुमच्यासारखे कुलुप लावून एसीत बसतात असा घणाघात जरांगे यांनी केला.
पाकिटे घेऊन कीर्तने करणारे तुम्ही
आमची गरिबाची लढाई आम्ही लढतो आहोत. त्या बाबाला आमचे दु:ख कळायचे नाही. आमची लोक रात्रंदिवस कष्ट करतात. त्यांचे दु:ख तुला कळायचे नाही. खरा वारकरी संप्रदाय आणि खरे हिंदुत्व चालवणारे खूप लोक आहेत देशात. त्यांच्यासमोर आम्ही नतमस्तक होतो. याला काय माहीत आहे हिंदुत्व. रोज झोपेतून उठल्यानंतर रामराम करतो आम्ही. तुला काय कळणार? तुला इतका हिंदुत्वाचा कळवळा आहे तर आमच्या लोकांचे दु:ख समजून घ्यायला तू आला का? का नाही म्हटलास की या हिंदूंनाही आरक्षण द्या, असा सवाल जरांगे यांनी केला.
आमच्या नादाला लागू नको
तुला सुपारी घ्यायची तर घे, पण आमच्या नादाला लागण्याची गरज नाही. तुझ्यासारखे टुकार लोक मराठ्याची पोरं खिशात घेऊन फिरतात. तुला मराठा परवडणार नाही असा इशाराही जरांगे यांनी कालीचरण महाराजांना दिला.