32.8 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeमहाराष्ट्रमतदानाच्या वाढीव टक्क्याचा फायदा कुणाला?

मतदानाच्या वाढीव टक्क्याचा फायदा कुणाला?

नंदुरबार लोकसभा मतदारसंघ; मतदारांमध्ये उत्सुकता

नंदुरबार : प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील अक्कलकुवा-धडगाव विधानसभा हा राज्यातील पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ असून, या मतदारसंघात आदिवासी लोकसंख्या बहुसंख्येने आहे. गेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. या वेळी धडगाव-अक्कलकुवा येथील मतदारांनी कोणाला पसंती दिली असेल व मतदारसंघात वाढलेली ३१ हजार ४१६ मते विजयासाठी कोणत्या उमेदवाराला फायद्याची ठरतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

या मतदारसंघावर काँग्रेसचे आमदार अ‍ॅड. के. सी. पाडवी यांचे वर्चस्व आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अ‍ॅड. पाडवींनी त्यांचे पुत्र अ‍ॅड. गोवाल पाडवी यांना काँग्रेसची उमेदवारी मिळवून देत सलग दोनदा भाजपच्या खासदार राहिलेल्या डॉ. हीना गावित यांच्या विरोधात राजकीय आखाड्यात उतरवून उच्चशिक्षित तरुण उमेदवार व नवीन चेहरा मतदारांसमोर आणला आहे.

या मतदारसंघात अक्कलकुवा शहरासह मक्राणी फळी, मिठ्या फळी, लहान राजमोही, मोठी राजमोही या गावांत मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे.

हा मतदार काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे. त्यामुळे साहजिकच काँग्रेसला याचा फायदा होत असतो; मात्र यंदा हा लाभ नेमका किती प्रमाणात होईल, हे निकालानंतरच समोर येईल. मतदारसंघात अक्कलकुवा व धडगाव हे दोन तालुके आहेत. दोन्ही तालुक्यांत लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या.

काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे, नटवर पाडवी, आरिफ मक्राणी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचे नेते व राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना साथ देत नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सत्तांतरात महत्त्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान, महाविकास आघाडीसोबत असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषद आमदार आमश्या पाडवी यांनी अचानक शिंदे गटात प्रवेश केला होता.
अ‍ॅड. गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अक्कलकुवा व धडगावमध्ये राजकीय समीकरण पूर्णत: बदलून गेले, याचा परिणाम निकालात काय दिसून येईल याची उत्सुकता आहे.

महायुतीच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारासाठी काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले माजी मंत्री पद्माकर वळवी, आमदार आमश्या पाडवी, भाजपचे नागेश पाडवी, जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे, यशवंत नाईक, जयमल पाडवी, शिवाजी पराडके, सुभाष पावरा, अक्कलकुवा भाजप तालुकाध्यक्ष नितेश वळवी, धडगाव तालुकाध्यक्ष हिरालाल पाडवी, कालूसिंग पाडवी यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती.

दरम्यान, डॉ. हीना गावित यांच्या प्रचारार्थ नंदुरबारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. यानंतर काँग्रेस उमेदवाराच्या समर्थनार्थ प्रियंका गांधी यांचीही सभा झाली होती.
या दोन्ही सभांत अक्कलकुवा, धडगाव विधानसभा मतदारसंघातून लाखोंच्या संख्येत मतदारांनी हजेरी लावल्याचा दावा दोन्ही पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते करीत असले तरी बाजी कोण मारेल, हे मात्र ४ जूनलाच स्पष्ट होईल. दरम्यान, अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत दीड टक्क्याने मतदार वाढले आहेत.
या वाढीव मतदानामुळे मतदारसंघात चुरशीचे चित्र आहे; मात्र याचा लाभ कोणत्या उमेदवाराला होतो, हे निकालानंतरच ठरणार तसेच पुढील विधानसभा निवडणुकीसाठीच्या राजकीय समीकरणांचा अंदाज बांधता येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. अक्कलकुवा-धडगाव विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एक लाख ४२१ पुरुष आणि ९७ हजार ६३६ महिला मतदारांनी मतदान केले होते.

१३ मे रोजी झालेल्या अक्कलकुवा मतदारसंघात एक लाख १९ हजार ५७१ पुरुष व एक लाख ९ हजार ९०२ महिला अशा एकूण दोन लाख २९ हजार ४७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ७७ टक्के पुरुष आणि ७२ टक्के महिलांनी यंदा मतदान केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR