नाशिक : प्रतिनिधी
नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे, अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यात प्रमुख लढत आहे. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे निवडणुकीच्या रिंगणात होते. आता उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून नाशिक आणि दिंडोरीतून कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. दिंडोरीत २०१९ च्या तुलनेत कमी म्हणजेच ६२.६६ टक्के मतदान झाले तर नाशिक मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला असून ५७.१० टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
ईव्हीएम आणि इतर साहित्य स्ट्राँगरूममध्ये दाखल
मतदान होताच ईव्हीएम आणि इतर साहित्य घेऊन अधिकारी, कर्मचारी नाशिक शहरातील अंबड वेअरहाऊसमध्ये दाखल होत असून येथे स्ट्राँगरूम तयार करण्यात आली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक पोलिसांकडून येथे तीनस्तरीय बंदोबस्त देण्यात आला आहे. तसेच या संपूर्ण परिसरावर चारही बाजूंनी सीसीटीव्ही कॅमे-यांची नजर असणार आहे.
स्ट्राँगरूमवर नाशिक पोलिसांचा वॉच
याबाबत नाशिक पोलिस उपायुक्त मोनिका राऊत म्हणाल्या की, येथे तीन स्तरावरील पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ईव्हीएम रूमला सीआरपीएफ जवानांच्या दोन प्लाटून तैनात आहेत. त्याबाहेर मध्यभागी एसआरपीएफच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. संपूर्ण आवारात नाशिक पोलिसांचे तीन वरिष्ठ अधिकारी आणि ४० कर्मचा-यांचा बंदोबस्त आहे. तसेच स्ट्राँगरूमच्या चारही बाजूंनी सीसीटीव्हीची करडी नजर आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींना याबाबतचे फुटेज दाखवण्यात येणार असून स्ट्राँगरूम लवकरच सील केली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मतदानाच्या दिवशी राज्यभरात चर्चा
लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून नाशिकच्या मतदारसंघाची राज्यभरात चर्चा सुरू होती. मतदानाच्या दिवशी देखील नाशिक लोकसभा राज्यभरात गाजली. अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांवर आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. जुन्या नाशिकमध्ये आजी-माजी आमदारांमध्ये बाचाबाची झाली. नाशिकमध्ये बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला. अनेक मतदान केंद्रांवर पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे दिसून आल्याने नाशिकची चर्चा राज्यभरात झाली.