22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रघड्याळ, झेंडा सगळ्याचीच होलसेल चोरी

घड्याळ, झेंडा सगळ्याचीच होलसेल चोरी

बारामती : प्रतिनिधी
पक्ष, घड्याळ, झेंडा सगळ्याचीच होलसेल चोरी झाली. सगळे सोडून गेले. संपूर्ण देशाला माहीत आहे, राष्ट्रवादी पक्ष कुणी स्थापन केला? जे गेले, त्यांनी मागच्या निवडणुकीत मते राष्ट्रवादीच्या नावाने, नेत्याच्या नावाने मागितली.

झेंडा घड्याळाचा होता. हे सगळे घेऊन मंडळी गेली. काही लोक नाराज झाले. मी म्हटले नाराज व्हायचे नाही. गेले ते गेले! आपण नवीन उभे करू. हा अधिकार लोकांनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आहे. नवीन पक्ष काढू, असे म्हणत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले. ते बारामतीमध्ये एका मेळाव्यात बोलत होते.

शरद पवार म्हणाले, काही नसताना पक्ष काढला, पक्ष नुसता काढला नाही तर राज्य हातामध्ये घेतले. अनेकांना मंत्री केले, अनेकांना आमदार केले, अनेकांना खासदार केले, अनेकांना केंद्राच्या मंत्रिमंडळात घेतले. नवनवीन धोरणे घेतली.

ते पुढे म्हणाले, एखाद्या दिवशी आपल्या घरात चोरी होते, म्हणून आपण घर चालवणे बंद करतो का? पुन्हा एकदा उभे राहू, त्याच पध्दतीने आम्ही आज हा निकाल घेऊन नवा पक्ष, नवी खूण, नवा झेंडा, कार्यक्रम जुनाच घेऊन पुढे आलो आहोत. नेहमीची खूण आहे ती आता गेली, आता तुतारी आली.शरद पवार म्हणाले, शिवछत्रपती विजय मिळवून आल्यानंतर दाराशी याच तुतारीने त्यांचे स्वागत होत असे.

आज महाराष्ट्रात झालेल्या बदलातून महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या जीवनाच्या परिवर्तनाची तुतारी वाजवायची आहे. त्यासाठी ही खूण लक्षात ठेवली पाहिजे. आणि हे काम तुम्ही लोकांनी करावे. शरद पवार म्हणाले, ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. लोकशाहीमध्ये कुणालाही भूमिका घ्यायचा अधिकार आहे. पण एक अट आहे.

मी तुम्हाला मत मागितले, तुम्ही मला मत दिले, तुम्ही मला निवडून दिले आणि निवडून दिल्यानंतर मी मत ज्या नावाने, ज्या पक्षाने, ज्या कार्यक्रमाने तुमच्याकडे मागितले, ते नाव, पक्ष, सगळे तुम्ही विसरलात.मग तुम्ही लोकांची फसवणूक करता. ही फसवणूक होता कामा नये. राजकारणामध्ये लोकांना दिलेला शब्द हा पाळला पाहिजे. लोकांचे भवितव्य हे पाळले पाहिजे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR