मुंबई : शासनाच्या महिला व बालविकास विभागाने कंत्राटी भरण्याचा आदेश काढला आहे. यातील काही पदे भरण्याचे कंत्राट पुण्यातील एका कंपनीला मिळाले आहे. या कंपनीबद्दल जयंत पाटील यांनी महायुती सरकारला प्रश्न विचारले आहेत. त्याचबरोबर खासगीकरणाच्या मुद्यावरून सरकारवर हल्ला चढवला आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कंत्राटी भरतीच्या मुद्यावरून सरकारला लक्ष्य केले आहे. जयंत पाटील यांनी शासनाच्या महिला व बालविकास विभागाने काढलेला शासन निर्णय पोस्ट केला आहे. यात त्यांनी पुण्यातील एका कंपनीबद्दल प्रश्न केले आहेत. जयंत पाटलांनी म्हटले आहे की शासनाच्या महिला व बालविकास विभागाने काल ३० ऑगस्ट रोजी एक शासन आदेश काढला आहे. त्यानुसार विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील २०६३ पदे कंत्राटी स्वरूपात भरण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यातील ११४५ पदे भरण्याचे कंत्राट पुण्यातील ज्या ब्रिक्स इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीला दिले आहे, याच कंत्राटदाराला वैद्यकीय शिक्षण विभागाचे कंत्राटी पद भरतीचे काम देखील नियम डावलून दिले आहे. ही कंपनी कोणाची आहे? हा कंत्राटदार कोणाचा लाडका आहे? याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला मिळाले पाहिजे असा सवाल जयंत पाटलांनी महायुती सरकारला केला आहे. शासनाच्या महिला व बालविकास विभागाने काल ३० ऑगस्ट रोजी एक शासन आदेश काढला आहे. त्यानुसार विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील २०६३ पदे कंत्राटी स्वरूपात भरण्याचा निर्णय घेतला आहे.
लाडक्या कंत्राटदारांसाठी कायम रोजगारावर गदा
या शासन आदेशाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले की, सरकार मागच्या दाराने खासगीकरण करीत आहे. राज्यातील बेरोजगार व्यक्तींच्या कायमस्वरूपी रोजगारावर लाडक्या कंत्राटदारांसाठी गदा आणली जात आहे. आमचे अगोदर पासून म्हणणे आहे की, हे सरकार गोरगरीब, शेतमजूर, सामान्य जनतेचे नसून बिल्डर आणि कंत्राटदारांचे देशातील आतापर्यंतचे सर्वात भ्रष्ट सरकार आहे अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.