मुंबई : विशेष प्रतिनिधी
निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल अशी चर्चा सुरू असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र बसू, ज्यांचे आमदार जास्त त्या पक्षाला मुख्यमंत्रिपदासाठी आम्ही पाठिंबा देऊ. तशी माझ्या पक्षाची भूमिका आहे असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस हे काय भूमिका घेतात याकडे सा-यांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले की, निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्रित बसू. ज्यांच्या पक्षाचे आमदार जास्त असतील त्यांना त्यांचा प्रतिनिधी निवडायला सांगू आणि त्याला आम्ही पाठिंबा देऊ. ही माझ्या पक्षाची भूमिका आहे.
राज्यात ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. महाविकास आघाडीचा जो कोणीही उमेदवार असो, त्याच्या पाठीशी आपण राहू असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते. तर उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा अशी भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली होती. त्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र त्यावेळी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नव्हती.
काँग्रेस-ठाकरेंची वेगळी भूमिका
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाल्यानंतर त्या पक्षाच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री अशी भूमिका काँग्रेसमधील काही नेत्यांनी घेतल्याची चर्चा होती. पण असे केल्यास मित्रपक्षांमध्ये आपले आमदार जास्त निवडून आणण्यासाठी सहकारी पक्षाचे आमदार पाडण्याची स्पर्धा लागू शकते असे ठाकरे गटाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यावर राष्ट्रवादीकडून मात्र कोणतीही भूमिका स्पष्ट होत नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही फॉर्म्युला जाहीर केला नाही किंवा मुख्यमंत्रिपदाचा चेहराही समोर केला नाही.
महाविकास आघाडी म्हणून तीनही पक्षांनी निवडणुकीला एकत्रित सामोरं जायचं आणि मुख्यमंत्रिपदाबाबत निवडणुकीनंतर निर्णय घ्यायचा ही भूमिका नेत्यांनी घेतली होती. आता शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदावर त्यांच्या पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. ज्यांचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री ही आपल्या पक्षाची भूमिका असल्याचं शरद पवार म्हणाले.