कुडूवाडी : परस्पर बचत गटाचे पैसे का उचलले व घरातील पैसे का खर्च केले या कारणावरून पतीने मित्राच्या मदतीने पत्नीचा गळा दाबून मारहाण करुन खून केला व मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पिंपळनेर (ता. माढा) येथील डोणवाडी कॅनॉलमध्ये फेकून दिल्याची घटना उघडकीस आली. संगीता नवनाथ डमरे (वय ३६, रा. आगळगाव, ता. बार्शी) असे मृत महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी मयताचा भाऊ विजय विठ्ठल गायकवाड (वय ३१, रा. कुळसंब) यांनी कुडूवाडी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. बचत गटाचे पैसे परस्पर उचलले आणि घरातील पैसे खर्च केले या कारणावरून मयत संगीताचा पती नवनाथ ज्ञानोबा डमरे याने त्याचा मित्र धनू उकरंडे यांच्या मदतीने पत्नी संगीताचा गळा दाबून मारहाण करून जीवे ठार मारून प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी प्रेत कॅनॉलमध्ये फेकून दिले. विजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरून नवनाथ ज्ञानोबा डमरे व धनाजी वैजनाथ उकिरडे (दोघे रा. आगळगाव ता. बार्शी). या दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही. तपास पोलीस उपनिरीक्षक संदेश नाळे हे करत आहेत.