परभणी : मनोज जरांगे यांची शुक्रवारी परभणी येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. सभेला संबोधित करताना जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या जो आड येईल त्याला आयुष्यभर गुलाल लागू द्यायचा नाही, वेळ येईल तेंव्हा आरक्षणाच्या मार्गात येणाऱ्यांची नावेही जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जरांगें यांचा पाचव्या टप्प्यातील दौरा सुरु आहे. परभणीच्या सेलूमध्ये शुक्रवारी मनोज जरांगेंची भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणात अडथळा आणण्यांवर नाव न घेता निशाणा साधला.
करोडोंच्या संख्येने मराठे एकत्र आले, ही लाट आता साधीसुधी नाही. तुमच्या नोटीसीला घाबरून ही लाट मागे फिरणार नाही. धमक्यांना घाबरत नाही, आम्ही धमक्या देत नसतो. आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. लोकशाहीप्रमाणे लढा सुरु आहे. ही सभा नाही, मराठ्यांची वेदना आहे, मराठ्यांनी ८० टक्के लढाई जिंकली आहे, अअसेही जरांगे यांनी म्हटले आहे.
तुमच्या जीवावर मी लढतोय
मराठ्यांनी मैदानात या. आता हटायचे नाही, तुमच्या जीवावर मी लढतोय. हे आरक्षण कसे देत नाही ते बघतो, नोटिसीला घाबरत नाही, आरक्षण घेतल्याशिवाय राहत नाही. मराठ्यांनी सावध व्हावे, एकजूट राहा, अशी संधी पुन्हा येणार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका, असे आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केले.
हल्ल्याचा निषेध
मनोज जरांगे यांनी सांगितले की, ‘आंतरवाली सराटीमध्ये आंदोलनावर हल्ला केला. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपोषण करणाऱ्यांवर हल्ला केला. माता-भगिनींच्या डोक्याच्या चिंधड्या-चिंधड्या केल्या. मांडीवर चार महिन्यांचे लेकरू घेऊन बसलेल्या महिलेचे डोके फुटले. असे म्हणत जरांगे यांनी सरकारवर निशाणा साधला असून त्या हल्ल्याचा निषेध केला आहे.