22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीय३० टक्के खासदारांचे भाजप तिकिट कापणार?

३० टक्के खासदारांचे भाजप तिकिट कापणार?

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप येत्या काही आठवड्यांत १६० कमकुवत जागांसाठी उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने यापैकी १३३ जागा गमावल्या होत्या. याशिवाय इतर अशा २७ जागा आहेत, ज्या भाजपासाठी कमकुवत मानल्या जातात. विशेष म्हणजे भाजप ३० टक्के खासदारांचे तिकिट कापणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. तसेच भाजप सार्वत्रिक निवडणुकीसाठी २२ जानेवारीला म्हणजेच राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यानंतर उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे.

भाजप आपल्या सध्याच्या लोकसभा खासदारांपैकी किमान ३० टक्के खासदार बदलण्याचा विचार करत आहे. भाजपने तिकीट बदलण्यासाठी ७० वर्षांपेक्षा जास्त वयाचे खासदार, तीनपेक्षा जास्त वेळा खासदार आणि लोकसभा मतदारसंघातील लोकप्रियता यांचा समावेश केला आहे. जवळपास ९० खासदारांना डच्चू देण्याच्या तयारीत भाजप आहे. मात्र, काही खासदारांना या तीन नियमांमध्ये सूट दिली जाऊ शकते. तसेच पाच वर्षांपूर्वी भाजपने तीन राज्यांतील ५६ जागांवर उमेदवार उभे केले नव्हते. यामध्ये भाजपने पंजाबमधील १३ पैकी ३, महाराष्ट्रातील ४८ पैकी २५ आणि बिहारमधील ४० पैकी १७ जागा लढवल्या होत्या.

पंजाब, बिहार आणि महाराष्ट्रातील अनेक मित्रपक्ष एनडीएमधून बाहेर पडले आहेत किंवा मित्रपक्षांची स्थिती चांगली नसल्याचे काही अहवालातून समोर आले आहे. अशा स्थितीत या राज्यांमध्ये नव्या मित्रपक्षांसोबत किंवा एकट्याने निवडणूक लढवण्याचा भाजपचा विचार करत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ५४३ पैकी ४३६ जागा लढवल्या होत्या. यापैकी भाजपाला १६० जागांवर विजय मिळाला नव्हता. ५१ जागांवर भाजपचे डिपॉझिट जप्त झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR