मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील गावे, शहरांमध्ये आर्थिक विकासाला मोठी गती देणारे नाविन्यपूर्ण उद्योग-व्यवसाय सुरू करण्यात येतील. देशाच्या विकासासाठी मुंबईचाही कायापालट करण्यात येत असून याठिकाणी आपली गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषद सुरू असून तेथील काँग्रेस सेंटर सभागृहात नागरी क्षेत्रातील आव्हाने, नाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास चर्चासत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. जागतिक बँकेच्या अहवालानुसार जगातल्या अनेक भागात तंत्रज्ञानाच्या जोरावर नाविन्यता जिल्हे (इनोव्हेशन डिस्ट्रिक्ट) पुढे आले आहेत. त्यामुळे त्या परिसरात जोरदार आर्थिक विकासाला चालना मिळत आहे. नाविन्यपूर्ण उद्योग, व्यवसाय, संशोधन संस्था आणि उद्योजकतेची वाढ ही या जिल्ह्यांची वैशिष्ट्ये आहेत. ज्ञानाचे आदान-प्रदान आणि तंत्रज्ञानाचा विकास करणारी इकोसिस्टीम या जिल्ह्यांनी तयार केली असून महाराष्ट्रातदेखील अशाच स्वरुपाची इकोसिस्टीम घडविण्यावर भर देण्यात येईल, असे शिंदे म्हणाले.
भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत स्टार्टअप आणि व्हेंचर कॅपिटल, संशोधन संस्थांसाठी लवचिक अशी इकोसिस्टीम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नेहमीच मार्गदर्शन आणि प्राधान्य आहे. नीती आयोगानेही तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीसाठी मुंबईला एक आघाडीचे शहरी केंद्र म्हणून निवडले आहे. आपण सर्वांनी मुंबईच्या माध्यमातून भारताच्या विकासगाथेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
समृद्धी महामार्गामुळे
विकास संकल्पना साकार
नवीन शहरे आणि नागरी केंद्रे स्थापन करून स्थानिक पातळीवर शाश्वत आर्थिक विकास होणे आवश्यक आहे, यावर भर देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आम्ही निर्माण केलेला मुंबई आणि नागपूर या दोन प्रमुख भागांना जोडणारा ७०० किमीचा समृद्धी महामार्ग या महामार्गालगत आम्ही औद्योगिक टाऊनशिप उभारत आहोत. ख-या अर्थाने शहरी विकासाची संकल्पना साकार करणारा हा पहिला महामार्ग असेल, असे शिंदे म्हणाले.