24.2 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeमहाराष्ट्रविरोधी पक्षनेते अंबादास दानवे सत्ताधारी पक्षात सहभागी होणार?

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सत्ताधारी पक्षात सहभागी होणार?

भाजप आमदारांचे मोठे वक्तव्य

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र की पात्र याबाबतचा निकाल येण्यासाठी अवघ्या काही तासांचा वेळ शिल्लक आहे. असे असतानाच भाजपचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. ‘विरोधी पक्षनेत्याने सत्ताधा-यांसोबत जाण्याची परंपरा आहे, त्यामुळे काहीतरी शिजतंय’ असे वक्तव्य बागडे यांनी केले आहे.

त्यांच्या याच वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सत्ताधारी पक्षात सहभागी होणार का?, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

सोमवारी छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील बैठकीत उपस्थित होते.

मात्र, सत्ताधा-यांविरोधात नेहमी आक्रमक भूमिका घेणा-या दानवेंनी या बैठकीत नरमाईची भूमिका घेतल्याची चर्चा आहे. यावरूनच भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांनी अंबादास दानवे यांना जोरदार टोला लगावला. ‘दानवेंचा बैठकीतील सूर हा प्रेमाचा होता व सत्ताधा-यांच्या बाजूने होता. विरोधी पक्षनेत्याने सत्ताधा-यांसोबत जाण्याची परंपरा आहे, त्यामुळे काहीतरी शिजतंय,’ असे बागडे म्हणाले.

दानवेंचा बागडे यांच्यावर हल्लाबोल
याच बैठकीत दानवे यांनी देखील बागडे यांना टोला लगावल्याचे पाहायला मिळाले. बैठकीत सत्ताधारी बागडे यांच्यासारख्या ज्येष्ठ लोकप्रतिनिधीचे चार-चार वर्षे काम होत नसल्याची टीका दानवे यांनी केली. बागडे ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांची कामे वर्षानुवर्षे होत नसतील तर बाकीच्यांचे काय? असेही दानवे म्हणाले. दानवे यांच्या याच टोलेबाजीनंतर बागडे यांनी बैठक संपल्यावर माध्यमांशी बोलताना दानवेंच्या नरमाईच्या भूमिकेचा ‘बॉम्ब’ टाकला.

पहिल्यांदाच एवढा मोठा पोलिस बंदोबस्त…
मागच्या जिल्हा नियोजन बैठकीत अंबादास दानवे आणि संदिपान भुमरे यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. तर, दानवे हे भुमरे यांच्या अंगावर धावून गेले होते. त्यामुळे कालच्या बैठकीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आतापर्यंतच्या जिल्हा नियोजन बैठकीत पहिल्यांदाच एवढा पोलिस बंदोबस्त पाहायला मिळत असल्याचे अनेक लोकप्रतिनिधी म्हणाले. विशेष म्हणजे बैठकी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांची पोलिसांना यादी देण्यात आली होती. यादीत नावे असलेल्या लोकांनाच आतमध्ये सोडण्यात येत होते. त्यामुळे कालची जिल्हा नियोजन समिती अनेक कारणांनी चर्चेत आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR