24.7 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeमहाराष्ट्रपंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवणार?

पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवणार?

बीड : प्रतिनिधी
ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून पुढे आलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांना केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील सामाजिक ताणेबाणे सावरण्यासाठी भाजपने विधानसभा निवडणुकीच्या आधी पावले टाकणे सुरू केले आहे. ओबीसी समाजाच्या पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघातील पराभव जिव्हारी लावला आहे.

आजवरचे योगदान लक्षात घेता त्यांना आणि त्यांच्या समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्यसभेवरील नियुक्तीचे पाऊल उचलले जाणे गरजेचे असल्याचे फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाला सांगितल्याचे विश्वसनीयरीत्या समजते. येत्या काही दिवसांत विधान परिषदेच्या उमेदवारांबरोबरच महाराष्ट्रातून रिक्त झालेल्या राज्यसभेच्या दोन जागांवर उमेदवार कोणते द्यायचे, हा निर्णय घ्यावा लागणार आहे.

यापूर्वी दोनदा पंकजा यांना विधान परिषदेवर नेमण्याचा प्रस्ताव प्रदेश भाजपने पाठवला होता. पंकजा यांचे पुनर्वसन केवळ त्यांच्यासाठी नव्हे तर भाजपच्या ओबीसी मतपेढीसाठी आवश्यक होते. मात्र त्या जननेत्या असल्याने त्यांना पक्षश्रेष्ठींनी लोकसभेची उमेदवारी दिली होती.

महाराष्ट्रात विधानसभेला सामोरे जाताना काही सामाजिक बांधणी करावी लागेल, असे भाजपच्या नेत्यांनी ठरवले आहे. या बांधणी अंतर्गतच महाराष्ट्राच्या प्रश्नांना केंद्रामध्ये उत्तमरीत्या वाचा फोडणा-या काही तरुण नेत्यांची तिथे गरज असेल, हे स्पष्ट आहे. ही गरज लक्षात घेता महिलांचे नेतृत्व आणि ओबीसी समाजाच्या नेत्या म्हणून पुढे आलेल्या पंकजा मुंडे यांना तेथे संधी देणे हे बेरजेच्या राजकारणातले महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे महाराष्ट्र भाजपने कळवले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR