22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रकांदा निर्यात व इथेनॉल निर्मितीवरील बंदी उठविण्यासाठी केंद्राला विनंती करणार

कांदा निर्यात व इथेनॉल निर्मितीवरील बंदी उठविण्यासाठी केंद्राला विनंती करणार

नागपूर : (प्रतिनिधी)
कांदा निर्यातीवरील निर्बंध, तसेच उसापासूनच्या इथेनॉलच्या निर्मितीवर घातलेली बंदी मागे घेण्यासाठी आपण लवकरच केंद्रीय मंर्त्यांची भेट घेऊन मार्ग काढणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. दूध दराच्या प्रश्नावरही मुख्यमंर्त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन शेतक-यांना दिलासा देणारे निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

विधानसभेत शेतक-यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाच्यावतीने स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र, या प्रस्तावाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अनुमती नाकारली. मात्र, यावर म्हणणे मांडण्याची संधी नार्वेकर यांनी विरोधी पक्षाला संधी दिली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांनी केंद्र सरकारचे कृषीमाल विषयक निर्यात बंदीचे धोरण आणि उसापासूनच्या इथेनॉलनिर्मितीवर केंद्र सरकारने आणलेली बंदी यामुळे शेतक-यांचे नुकसान होत असल्याचा मुद्दा मांडला. केंद्र सरकार राज्याच्या शेतमाल निर्यातीचे मार्ग बंद करत असल्याचे सांगत कांदा निर्यातीबाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. त्यापूर्वी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सर्व कामकाज बाजुल ठेवून चर्चा करण्याची मागणी केली.

यावर उत्तर देताना अजित पवार यांनी राज्यातील शेतक-यांच्या सर्वच प्रश्नावर चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचे सांगितले. अवकाळी पाऊस, गारपिट, दूध, कापूस, संत्रा आणि ऊस उत्पादक शेतक-यांच्या समस्यांबाबत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्याशी चर्चा झाली असून सर्व शेतक-यांना दिलासा मिळेल, असा निर्णय घेतला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉलचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. तर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी साखरेपेक्षा इथेनॉल तयार करण्याचा सल्ला साखर कारखान्यांना दिला आहे. पण केंद्र सरकारने अचानक उसापासूनच्या इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात मी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली आहे. कारण या निर्णयामुळे अनेक साखर कारखान्यांना ऊस गाळता येणार नाही. त्यामुळे दिल्लीला जाऊन केंद्रीय मंर्त्यांना भेटून शेतक-यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्याबाबत आमची चर्चा झाली आहे. त्यानुसार सोमवारकिंवा मंगळवारी दिल्लीत जाऊन चर्चा केली जाईल. या बैठकीत कांदा उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नाविषयी चर्चा करून मार्ग काढण्याचा सरकार कसोशीने प्रयत्न करेल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.

दूध उत्पादकांच्या संदर्भात मुख्यमंर्त्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली जाईल. कामाच्या व्यापात मुख्यमंर्त्यांना वेळ मिळाला नाही तर त्यांच्या परवानगीने आपण स्वत: आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन शेतक-यांना दिलासा देणारा निर्णय घेऊ, असेही अजित पवार यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR