25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवार गट १०० जागांवर लढणार?

शरद पवार गट १०० जागांवर लढणार?

निरीक्षकांना सूचना जारी दोन दिवसांत रुपरेषा ठरणार

पुणे : विधानसभेच्या निवडणुका येत्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या असून या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षामध्ये जागावाटपाची चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून ९० ते १०० जागांवर लढण्याची तयारी सुरु झाली आहे. सूत्रांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

सूत्रांनी सांगितल्यानुसार, शरद पवार गट ९० ते १०० जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. प्राथमिक स्तरावर तयारी असावी म्हणून १०० च्या जवळपास जागांसाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नेमलेल्या निरीक्षकांना झूम मीटिंगद्वारे यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत. पक्षाचा अहवाल लवकरात लवकर गोळा करा आणि बूथ कमिट्या तयार करा अशा सूचना वरिष्ठ नेत्यांनी निरीक्षकांना दिल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाने नेमलेल्या निरीक्षकांची झूम मीटिंग झाली होती. यामध्ये यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत. गणपती उत्सवांनंतर पक्षाला अहवाल दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

काँग्रेसलाही जास्त जागा हव्यात
विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये लागतील अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे काँग्रेस जास्त जागा मागत असल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे ठाकरे गट देखील अधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी आग्रही असल्याचे समजते.

हालचालींना वेग
शरद पवार गटाने १०० जागांवर चाचपणी सुरु केली असल्याचे समजत आहे. यात काही जागा कमी होऊ शकतात. पण, प्राथमिक चर्चा म्हणून १०० जागांसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. यासंदर्भात संबंधितांना सूचना देखील देण्यात आल्या आहेत. शरद पवार गट प्रत्यक्षात किती जागा पदरात पाडून घेण्यात यशस्वी ठरते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, महायुतीमध्ये जागावाटपाच्या चर्चेदरम्यान नेत्यांचा कस लागत असल्याची माहिती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR