वाघोली : देव आले तरी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याशिवाय आता कोणी रोखू शकणार नाही. ७० वर्ष मराठे आपल्या हक्कापासून दूर राहिले. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. गोळ्या झाडल्या तरी चालतील. पण, आरक्षण घेवूनच राहणार. मराठा वादळ काय आहे हे आता मुंबईत कळेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी वाघोलीत पहाटे ४:३० वाजता झालेल्या सभेत दिला.
भर कडाक्याच्या थंडीत सभेला हजारोंची उपस्थिती होती. रांजणगाव येथील मुक्कामानंतर ४.२० मिनिटांनी जरांगे पाटील यांचे वाघोलीतील मुक्कामाच्या ठिकाणी आगमन झाले. मैदानात येताच त्यांनी व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सभेला सुरुवात केली.
जरांगे पुढे म्हणाले, सरकारला सांगत होतो मराठ्यांच्या नादी लागू नका. आरक्षणाचा अध्यादेश काढण्यासाठी सरकारला मुदतवाढ दिली. मात्र, त्यांनी चालढकल केली. ओबीसीतून आरक्षण हा मराठ्यांचा हक्क आहे. तो मिळवणारच. कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणावर सापडल्या. एवढ्या नोंदी असूनही मराठ्यांना आरक्षण नाही आणि ज्यांची कोणतीही नोंद नाही त्यांना आरक्षण दिले.
नोंदी सापडल्या असल्या तरी अजून प्रमाणपत्र दिले नाही. एकाची नोंद आढळली तरी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आरक्षण मिळाले पाहिजे. ही आमची मागणी आहे. ज्यांनी सोसले त्यांनाच कळते आरक्षण का गरजेचे आहे. पुढच्या पिढीला तरी त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. आता नाही तर पुन्हा नाही. म्हणून आता माघार नाही. असे सांगत त्यांनी प्रत्येक मराठ्याने मुंबईत दाखल व्हावे, असे आवाहनही केले.