27.7 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्र'ते' आमदार राजीनामा देणार का?

‘ते’ आमदार राजीनामा देणार का?

नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाचे पडसाद नागपूर हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळत असून महाविकास आघाडीच्या आमदारांकडून महायुती सरकारचा निषेध करण्यात येत आहे. डोक्यावर निळी टोपी आणि हातात बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घेऊन विरोधी आमदारांनी संविधान चौकापासून विधान भवनापर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर विधान भवनाच्या पाय-यांवर आमदारांनी अमित शहांविरोधात घोषणाबाजी केली.

यावेळी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. ते म्हणाले की, देशातील जनता रस्त्यावर उतरली आहे. अमित शाहांनी फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला नाही तर देशातील जनतेचा आणि संविधानाचा अपमान केला आहे. रामदास आठवले, चंद्राबाबू आणि नितीश कुमार भाजपासोबत राहणार आहेत का? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. अनेक आमदार स्वत:ला आंबेडकरवादी मानतात जे भाजपासोबत आहेत ते राजीनामा देणार आहेत का, त्यांनी राजीनामा देणे गरजेचे आहे अशी मागणी त्यांनी केली.

त्याशिवाय या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान झाला आहे त्याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. विधानाचा विपर्यास केला जातोय असं सांगतात, पण त्यांच्या भाषणात ते स्वत: बोलले होते. आंबेडकरांचे नाव घेणे फॅशन झालंय हे कोण बोलले, तुम्हीच बोलला मग विपर्यास कसा झाला? भाजपाची मानसिकता तीच आहे त्यामुळे ते माफी मागणार नाहीत. जर चुकून बोलले असते तर माफी मागून मोकळे झाले असते. अनेकदा माणसांकडून चुका होतात, कुणीही चुकू शकते परंतु माफी मागतात, विनम्रता दाखवली जाते. भाजपाच्या मनात संविधानाबद्दल जो राग आहे तो त्यांच्या भाषणात दिसला असा आरोप आदित्य ठाकरेंनी भाजपावर केला.

दरम्यान, विरोधकांनी विपर्यास केला असे ते बोलत असतील तर त्यांच्यामागून कुणी आवाज काढत होते का, सभागृहात त्यांनीच विधान केले. ते चुकीचे बोललेत हे आम्ही सांगतोय. आता माफी मागितली तरी भाजपाची मानसिकता बदलणार आहे का? डॉ. बाबासाहेब यांचा अपमान भाजपातील आंबेडकरवादी आमदार सहन करणार आहेत का..? देशात सगळीकडे आंदोलन सुरू आहे. देशात या गोष्टीमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR