मुंबई : राज्याला लवकरच तिसरा मुख्यमंत्री मिळणार आहे आणि तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतीलच असणार आहे. यासाठी पडद्यामागे हालचाली सुरु आहेत, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
एकनाथ शिंदेनी पालकमंत्रीपदाचा वाद सोडवावा. ते आधी मुख्यमंत्री होते, नंतर उपमुख्यमंत्री झाले, उद्या ते ही राहणार नाहीत, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला. संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले की, तिसरा उपमुख्यमंत्री लवकरच महाराष्ट्राला मिळतो. तो त्यांच्याच पक्षातील आहे. त्याचा त्यांनी विचार करावा. मी नाव घेत नाही. पडद्यामागे हालचाली सुरू आहेत. एका राज्याला तीन उपमुख्यमंत्री मिळणार आहे. यांचे वजन होत कुठे. टायरमध्ये पंपाने हवा भरतात, तसे अमित शाहने तयार केलेले हे नेते आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर घणाघात केला, ते म्हणाले की, मी हिंदुहृदयसम्राटांचा विचार नेणारा एकमेव व्यक्ती आहे असे सांगितले जाते. मुळात बाळासाहेबांनी कुणाची लाचारी पत्करायला शिकवलं नाही,आज जी काही चाटुकारिचा आहे. हा बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता. भ्रष्टाचार, महाराष्ट्राची लूट, महाराष्ट्राचे अध:पतन आणि उघड्या डोळ्यांनी पाहणारे लाचार राज्यकर्ते आहेत.
हा जर बाळासाहेबांचा विचार आहे असं वाटत असेल तर हा महाराष्ट्र अत्यंत धोकादायक लोकांच्या हाती गेला आहे, असे मी मानतो असे राऊत म्हणाले. एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख नाहीत किंवा शिवसेनेचे वारस नाहीत. एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक हे ईडी सीबीआयच्या भीतीने पळून गेलेले जयचंद आहेत. आपली कातडी वाचवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राच्या शत्रूला मदत करायचे ठरवले आहे.
त्यांच्याकडे भ्रष्ट मार्गाचा पैसा
त्यांच्याकडे भ्रष्ट मार्गाने मिळवलेला पैसा आहे. त्या पैशाच्या माध्यमातून लोक विकत घेणे. संस्था, मतदारांना विकत घेऊन निवडणूक जिंकणे याला तुम्ही राजकारण म्हणत असाल तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर तुम्ही थुंकण्याचा प्रयत्न करत आहात. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना तेच हवे आहे, अशी घणाघाती टीका देखील संजय राऊत यांनी केली.