टोकिओ : जपानच्या एका खासगी कंपनीचा अंतराळात रॉकेट पाठवण्याचा प्रयत्न फसला आहे. एका खासगी कंपनीचे रॉकेट लाँच केल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच हवेत स्फोट झाला. या स्फोटाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
जपानचे खासगी क्षेत्रातील पहिले रॉकेट टेक ऑफ केल्यानंतर काही क्षणातच कोसळले. एका खासगी कंपनीच्या वतीने या पहिल्या रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले होते. मात्र रॉकेटचे प्रक्षेपण केल्यानंतर त्याचा लगेच स्फोट झाला.
या स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट पसरल्याचे पाहायला मिळाले. यानंतर येथे लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी तेथे पाणी टाकण्यात आले. हे रॉकेट टोकिओ मधील स्टार्ट-अप कंपनी ‘स्पेस वन’चे होते. मात्र कंपनीने अद्याप याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
‘स्पेस वन’ कंपनी जर या रॉकेटच्या माध्यमातून सॅटेलाईट यशस्वीरित्या अंतराळात पाठवू शकली असती तर ती ही कामगिरी करणारी पहिली खाजगी जपानी कंपनी ठरली असती. मात्र त्यांचे हे ध्येय पूर्ण होऊ शकले नाही. या दुर्घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जपानी मीडियानुसार, या रॉकेटच्या प्रक्षेपणाला अनेकदा टाळण्यात आले होते.