27.5 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeमहाराष्ट्रमहिला पोलिसच असुरक्षित?

महिला पोलिसच असुरक्षित?

थेट विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात तक्रार

नागपूर : राज्यात महिलांवर बलात्कार, विनयभंग, अपहरण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आता राज्यातील महिला पोलिसही असुरक्षित असल्याचे चित्र आहे. राज्यातील आठ महिला पोलिसांवर त्यांच्या तीन वरिष्ठांनीच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कार्यालयातही महिला पोलिस शिपायावर अत्याचार झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे.

या घटनेबाबत स्वत: वडेट्टीवार यांनी ट्विट करत सरकार आणि पोलिस प्रशासनाला धारेवर धरले आहे.
वडेट्टीवार ट्विटमध्ये म्हणतात की, पोलिस उपायुक्त, सशस्त्र पोलिस नायगाव, यांच्या कार्यालयात कार्यरत महिला पोलिस शिपायावर होत असलेल्या अत्याचाराबाबतची तक्रार माझ्या कार्यालयाला प्राप्त झाली आहे. अश्लील शेरेबाजी, कार्यालयात काम करत असतानाचा व्हीडीओ बनवणे, अश्लील हावभाव करून अत्याचार झाल्याची तक्रार सदर महिलेने केली आहे. वरिष्ठांकडे याबाबत तक्रार केल्यावर त्यावर कारवाई करण्याऐवजी सदर महिलेला मानसिक त्रास देण्यात आल्याची माहितीसुद्धा तक्रारीतून देण्यात आली आहे.

वडेट्टीवार पुढे म्हणाले की, राज्याच्या पोलिस दलात मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी कार्यरत आहेत. राज्यातील महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या खात्याकडे आहे तेथीलच महिला कर्मचारी जर सुरक्षित नसेल तर राज्यातील इतर महिलांच्या सुरक्षेची काय स्थिती असेल, याचा अंदाज न लावलेला बरा. पोलिस दलात कर्तव्यावर असताना होत असलेल्या अत्याचारामुळे महिला कर्मचा-यांचे मनोधैर्य खचत असून नैराश्याची भावना त्यांच्या मनात घर करत आहे.

पोलिस दल, सत्ताधा-यांकडून न्याय मिळत नसल्यामुळे महिला पोलिस कर्मचारी विरोधी पक्षनेत्यांना पत्र लिहून न्याय मागत असेल तर सध्याच्या सरकारमध्ये पोलिस विभाग आतून किती पोखरला गेला आहे, हे स्पष्ट होते. गृहखात्याने पोलिस दलात महिलांवर होत असलेल्या लैंगिक अत्याचाराची, छळाची आता तरी गांभीर्याने दखल घ्यावी आणि आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR