21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रआगामी निवडणुकीत महिला निवडून येतील

आगामी निवडणुकीत महिला निवडून येतील

अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : अजित पवार गटाचा महिला पदाधिकारी मेळावा आज मुंबईत पार पडला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबोधित केले. आगामी लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकीत महिला निवडून येतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

अजित पवार म्हणाले, १० जूनला पक्षाची स्थापना झाली तो दिवस आठवतो आहे. वेगवेगळ्या वेशभूषा करून महिला आल्या आहेत. अधिवेशनासाठी नागपूरमध्ये असताना गडचिरोलीला दौ-यावर गेलो होतो. तेथे नक्षली घटना घडतात. त्या ठिकाणी मुली मोठा वोल्हो चालवताना दिसल्या. एसटी महामंडळात काही महिला चालकसुद्धा आहेत. विमान प्रवासात देखील पायलट या महिला असतात. काम चोख करण्याची महिलांची रीत आहे. मंचावर काही कागद पडले होते. रुपालीताई उठल्या पण एकही गडी ते कागद उचलायला उठला नाही.

महिला जे काम करतात ते चोखपणे करतात. कुठलेही काम असू द्या महिला पुढे येतात. आम्ही जेव्हा महिलांचे बिल पास केले. रात्री दोन-तीन वाजेपर्यंत सभागृहात थांबलो होतो. रात्री तीन वाजता बिल पास झाले. महिला सशक्तीकरणासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. महिला धोरणात काही गोष्टी होत्या त्यावर अदिती तटकरे यांनी अभ्यास केला आहे. ६ लाख कोटींचे बजेट एवढे राज्याचे बजेट मी सादर करतो. महिलांच्या सुरक्षेसाठी काही कायदे केले आहेत. दुर्दैवाने ते केंद्रात अडकले आहेत. राष्ट्रपतींकडे अडकले आहेत. अदिती आपण एकदा दिल्लीत जाऊन राष्ट्रपतींची भेट घेऊन तो विषय पुढे नेऊ, असे अजित पवार म्हणाले.

आगामी निवडणुकांवर देखील अजित पवार यांनी भाष्य केले. लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. फेब्रुवारी झाला की आचारसंहिता लागेल. राज्यात महायुतीचे मेळावे होतील. त्या मेळाव्याला देखील महिलांनी हजेरी लावावी, असे आवाहन अजित पवारांनी केले.

महाराष्ट्राच्या हिताचे प्रकल्प राज्यात आले पाहिजेत. न्हावा शेवासारखी विकासाची कामे आपण केली पाहिजेत. दुधाचा व्यवसाय टिकला पाहिजे म्हणून संबंधित महिला – पुरुषांच्या खात्यात पैसे देतो. कांद्याचा प्रश्न आहे. तो विषय आम्ही पंतप्रधानांच्या कानांवर घातला आहे. शब्दांचा पक्का म्हणून माझी ओळख आहे. कोणाला खेळवत ठेवणे मला जमत नाही. राज्यात वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. मात्र समाजात सामाजिक सलोखा राखला पाहिजे. सुसंस्कृत महाराष्ट्र अशी आपली ओळख आहे, असे अजित पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR