22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्र२८८ मतदारसंघात ताकदीने कामाला लागा

२८८ मतदारसंघात ताकदीने कामाला लागा

मुंबई : महाराष्ट्रात येणा-या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्रित ताकदीने लढू. परंतु २८८ मतदारसंघात संघटनात्मक बांधणीसाठी ताकदीने कामाला लागा असा आदेश माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांना दिले आहेत.

शिवसेना भवन येथे आज जिल्हाप्रमुख, प्रमुख नेते, आमदार, खासदारांची बैठक उद्धव ठाकरेंनी घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि येणा-या निवडणुकीतील तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही विधानसभा निवडणूक लढू आणि महाराष्ट्राची सत्ता काबीज करू. परंतु ते करत असतानाच संघटना बळकटीच्या दृष्टीने २८८ मतदारसंघात आज आहे त्यापेक्षा अधिक मजबूत करण्यासाठी कामाला लागा असे जिल्हाप्रमुखांना पक्षप्रमुखांनी आदेश दिलेत. एखादी विधानसभा आम्ही लढू किंवा नाही परंतु त्याठिकाणी २८८ मतदारसंघात संघटना जिद्दीने उभी राहिली पाहिजे असे बैठकीत ठरले आहे.

तसेच ज्या महाविकास आघाडीने एकत्रितपणे भाजपाला दिल्लीत बहुमतमुक्त केले, तीच महाविकास आघाडी महाराष्ट्रात पुन्हा एकत्रितपणे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस ताकदीने विधानसभा जागा लढू आणि १८० ते १८५ जागा महाराष्ट्रात जिंकू असा निर्धार शिवसेनेच्या बैठकीत करण्यात आला. विधानसभेच्या दृष्टीने संघटना बांधणीसाठी पावसाळा असला तरी उद्धव ठाकरे मेळावे आणि सभेचे आयोजन करण्यात येत आहे. लवकरच त्याबाबत तारखा जाहीर करू असे सांगत संजय राऊतांनी मविआतच विधानसभा लढणार असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, आज शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जिल्हाप्रमुख, प्रमुख नेते, आमदार, खासदार यांची बैठक झाली. मुंबईचे विभागप्रमुखही होते. संघटना बांधणीवर जोर देण्याबाबत चर्चा झाली. आम्ही विधानसभा निवडणूक ताकदीने लढू. २८८ मतदारसंघात संघटना बांधणी होणे गरजेचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक, पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका असतील त्याबाबतचा तयारीचा आढावाही आजच्या बैठकीत घेण्यात आला. भाजपा आणि त्यांच्या इतर मित्रमंडळींना आम्ही रोखले आहे. नरेंद्र मोदींचे बहुमत खाली आणण्यात, भाजपाला बहुमतमुक्त करण्यात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे योगदान मोठे आहे असा टोला संजय राऊतांनी भाजपाला लगावला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR