मुंबई : प्रतिनिधी
भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण होत आहे. विविध कारणांमुळे भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. शुक्रवारी जेव्हा बाजार बंद झाला, तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जानेवारी महिन्यात म्हणजेच पहिल्या १० दिवसांत २२१९४ कोटी रुपये भारतीय शेअर बाजारातून काढून घेतले. लवकरच अमेरिकेत ट्रम्प यांची सत्ता येणार आहे. त्यानंतर टॅरिफ वॉर वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांनी काढता पाय घेण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.
भारतातील कंपन्यांचे तिस-या तिमाहीतील निकाल कमजोर असण्याची शक्यता, डॉलरचे मजबूत होणे त्याचवेळी अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता येणार आहे. ते लवकरच राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. त्यानंतर टॅरिफ वॉर वाढण्याची शक्यता असल्याने विदेशी गुंतवणूकदारांकडून काढता पाय घेतला जात आहे. डिसेंबर महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात १५४४६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
डिपॉजिटरीच्या आकडेवारीनुसार विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून १० जानेवारीपर्यंत २२१९४ कोटी रुपये काढण्यात आले आहेत. २ जानेवारीचा दिवस वगळता ज्या दिवशी बाजार सुरू होता, त्या दिवशी विदेशी गुंतवणूकदारांनी त्यांचे समभाग विकून २२१९४ कोटी रुपये काढून घेतले आहेत. अलिकडे विदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे भारतीय बाजारातील तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. भारतीय बाजारातून गुंतवणूक काढून घेणे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मारक ठरू शकते.
मॉर्निंगस्टार इन्वेस्टमेंट रिसर्च इंडियाचे असोसिएट डायरेक्टर आणि रिसर्च मॅनेजर हिमांशू श्रीवास्तव यांनी म्हटले की, भारतीय बाजारातून विदेशी संस्थांकडून पैसे काढून घेतले जात आहेत, त्याला अनेक कारणे आहेत. यामध्ये कंपन्यांचे तिस-या तिमाहीच्या कामगिरीचे निकाल कमजोर असू शकतात हे एक कारण असू शकते.
विकासदरात मंदीचा फटका?
ट्रम्प प्रशासनातील टॅरिफ वॉरची शक्यता, जीडीपीच्या विकास दरात आलेली मंदी, वाढलेली महागाई, भारतात व्याज कपात सुरू होण्याबाबत असलेली अस्थिर स्थिती, याशिवाय भारतीय रुपयाचे कमजोर होणे, अमेरिकी बाँड ईल्डमध्ये झालेली वाढ, भारतीय शेअर बाजाराचे अधिक मूल्यांकन यामुळेदेखील विदेशी गुंतवणूकदार समभाग विक्री करत आहेत.
डॉलर इंडेक्समध्ये वाढ
जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार वी. के. विजयकुमार यांनी म्हटले की, एफपीआयकडून सातत्याने सुरू असलेल्या विक्रीचे कारण डॉलर इंडेक्समध्ये होत असलेली वाढ हे एक आहे. जो सध्या १०९ वर आहे. १० वर्षांसाठी बाँडवरील परतावा ४.६ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे गुंतवणूकदार बाजारातून पैसे काढून घेत आहेत.