28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeपरभणीयेलदरी धरण तुडूंब भरले

येलदरी धरण तुडूंब भरले

जिंतूर/प्रतिनिधी
मराठवाड्यातील परभणी, हिंगोली व नांदेड या ३ जिल्ह्यातील गावांची तहान भागवणारे जिंतूर तालुक्यातील येलदरी धरण १०० टक्के भरल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. धरणाचे २ वक्र दरवाजे उघडण्यात आले असून ४२२० क्युसेक्स तर वीज निर्मिती केंद्राच्या ३ दरवाज्यातून २६०० क्युसेक्सने असा पूर्णा नदी पात्रात ६८२० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच साडेबावीस मेगावॅट एवढी वीज निर्मिती देखील सुरू झाली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाच्या दरवाजामधून शनिवार, दि.१२ रोजी सकाळी ४४००० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आल्यामुळे येलदरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे पूर नियंत्रणासाठी येलदरी धरणाच्या जलविद्युत केंद्रातील ३ संचांमधून वीज निर्मितीद्वारे पूर्णा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. यावर्षी येलदरी धरण भरेल की नाही अशी शंका वाटत असतानाच संपूर्ण पावसाळ्याअखेर थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे येलदरी धरणात हळूहळू पाणी साठण्यास सुरुवात झाली.

जून, जुलै व ऑगस्ट या महिन्यामध्ये धरणात २७ ते ३० टक्के एवढाच पाणीसाठा उपलब्ध झाला होता. मात्र सप्टेंबर महिन्यानंतर मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे येलदरी धरणात देखील मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागले. त्यानंतर पावसाचा जोर मंदावल्यामुळे धरण १०० टक्के भरेल की नाही असे वाटत असतानाच पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे येलदरी धरण आज पावसाळ्याअखेर १०० टक्के भरले आहे.

त्यामुळे मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि नांदेड या ३ जिल्ह्यातील मिळून ६०००० हेक्टर एवढ्या जमिनीतील सिंचनाचा प्रश्न मिटला असून औद्योगीकरणासह ३ जिल्ह्यातील तालुके व २३५ हुन अधिक खेडे, वाड्या, तांडे आदींचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील मिटला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे.

खडकपूर्णा धरणातून विसर्ग सुरू झाल्याने आज दुपारी १२ वाजता येलदरी धरणाचे २ गेट ०.५ मी. ने उघडण्यात आले आहेत. सध्यस्थितीत वीज निर्मिती केंद्रातून ३ टरबाईनने २६०० कुसेक्सने विसर्ग चालू आहे. तर मुख्य १० दरवाज्यापैकी २ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. यातून ४२२० कुसेक्स पाणी नदी पात्रात सोडल्या जात असून दोन्ही मिळून ६८२० कुसेक्स एवढा विसर्ग पूर्णा नदीत सोडण्यात येत आहे.

येलदरी धरणाच्या वरच्या भागात असलेल्या खडकपूर्णा धरणातून विसर्ग वाढविल्यास येलदरी धरणाचे आणखीन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे. त्यामुळे पूर्णा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे पाटबंधारे विभागाच्या वतीने कळवण्यात आले आहे. येलदरी धरण भरल्याने शेतक-यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR